पुणे, : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या चलनात असलेल्या 500 व 1000 रूपयांच्या नोंटा बंद होणार असून त्याऐवजी नवीन 500 व 2000 रूपयांच्या नोटा चलनात येणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर एक दिवस सर्व बँका बंद होत्या. पण 10 नोव्हेंबरला बँका पुन्हा सुरू झाल्यावर सामान्य नागरिकांनी सर्वच बँकांमध्ये एकच गर्दी केली. सिहंगड परिसरातील बँकांमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर या प्रक्रियेसाठी बँकेत येणार्या नागरिकांना मदत करण्याकरीता स्थानिक नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी पुढाकार घेतला आहे.
सिहंगड रस्ता परिसरात महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी तसेच आयडीबीआय बँकेत जाऊन नागपुरे यांनी नोटा बदलण्यासाठी असलेला अर्ज भरून देण्याकरीता आम्ही सामान्य नागरिकांना मदत करतो, अशा प्रकारचे आवाहन वरील सर्व बँकांमधील व्यवस्थापकांना केले. तसेच हा व्यवहार करण्यासाठी सकाळपासून रांगेत ताटकळत राहणार्या प्रत्येक नागरिकासाठी पाणी व बिस्किटची सोय देखील नागपुरे यांनी केली आहे.
ही प्रक्रिया पार पडत असताना कोणत्याही प्रकारचा गदारोळ होणार नाही, बँक कर्मचारी व सामान्य नागरिकांमध्ये वादावाद होणार नाही तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी वरील चार बँकांच्या ठिकाणी नागपुरे यांच्यावतीने स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने नागपुरे यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे उपस्थित नागरिकांकडून कौतुक होत असून ही प्रक्रिया त्यांना अधिक सोपी-सोयीस्कर वाटू लागली आहे.