पुणे : सहकारातील अपप्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. मात्र, रुपी बँकेच्या 5 लाख ठेवीदारांच्या हितासाठी राज्य शासन नक्कीच प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या कोथरुड शाखेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार भीमराव तापकीर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्यासागर अनास्कर, सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे, नगरसेविका मोनिका मोहोळ, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल आदी उपस्थित होते.
राज्य शासनाने कडक भूमिका घेऊन सहकारात शुद्धीकरणाचा प्रयत्न सुरू केला आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची शासनाची भूमिका आहे. रुपी बँकेच्या पुनर्रचनेचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. काहींना त्याग करावा लागेल. त्यातून ही बँक पुन्हा उभी राहू शकेल. नागपूर नागरिक सहकारी बँक ही नागपूर आणि विदर्भातील सर्वाधिक प्रगतीशील बँक म्हणून ओळखली जाते. या विभागातील उद्योगांना अर्थपुरवठा करुन विदर्भाच्या औद्योगिक वाढीमध्ये आपला वाटा उचलला आहे. पुणेकरांनाही ही बँक निश्चितच आपली वाटेल. कोअर बँकिंग, किऑस्क आदी नवनवीन अत्याधुनिक सेवा देऊन या बँकेने सामान्यांना आपली वाटणारी बँक असा नावलौकिक कमावला आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
पालकमंत्री श्री.बापट म्हणाले, सहकारातील अपप्रवृत्तींना चाप लावण्याचे काम राज्य शासन करीत असल्याचे या क्षेत्रात होत असलेल्या कारवाईने स्पष्ट होत आहे. राज्य शासनाने अडचणीतील जिल्हा बँकांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. नागरी सहकारी बँकानाही आर्थिक मदतीची गरज आहे.
श्री. शेंडे म्हणाले, नागपूर नागरिक सहकारी बँक ही पारंपरिकतेकडून आधुनिकतेकडे जाणारी, ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देणारी विदर्भातील पहिली बँक आहे. लवकरच नेट बँकिंग सेवा सुरु करण्याचा बँकेचा मानस आहे. बँकेने येथे मल्टिबील मशीन बसविले असून त्यातून वीज, दूरध्वनी, कर आदी अनेक प्रकारची देयके भरण्याची सुविधा असून राज्यात हे मशीन पहिल्यांदाच बसविण्यात आल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविक बँकेचे उपाध्यक्ष राजेश लखोटिया यांनी केले.

