स्वच्छता क्रमवारीत देशात दुसरे मानांकन: मानांकन यादीतील महाराष्ट्रातील एकमेव कॉलेज
बारामती: स्वच्छ भारत अभियानांतर्गत मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने देशपातळीवरील शिक्षण संस्थांची स्वच्छता
मानांकने जाहिर करण्यात आली. या मानांकनात विद्याप्रतिष्ठानच्या आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेजने स्वच्छता मानांकनात
देशात दुसरे स्थान पटकविले. देशभरातील साडेतीन हजार शिक्षण संस्थांनी या स्पर्धेसाठी ऑनलाईन अर्ज केला होता, महाराष्ट्रातील
केवळ याच कॉलेजला मानांकन यादीत स्थान मिळविण्याचा मान मिळाला आहे.
दिल्ली येथील हॉटेल अशोका येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रिय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते
विद्याप्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनेत्रा पवार आणि आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी हा पुरस्कार स्विकारला. या कार्यक्रमाला युजीसीचे चेअरमन डॉ. विरेंदरसिंग चौहान, एआयसीटीईचे चेअरमन डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे आदी मान्यवर उपस्थित होते.
देशात सुरू असणाऱ्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्रिय मनुष्यबळ मंत्रालयाच्यावतीने पाच वेगवेगळ्या विभागासाठी
देशातील एकूण 40 हजार शिक्षण संस्थांकडून ऑनलाईन अर्ज मागविले होते. या अभियानाला प्रतिसाद देत देशातील सुमारे साडेतीन हजार शिक्षण संस्थांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या अर्जातील गुणांकनात सरस असणाऱ्या 174 शिक्षण संस्थांना देशाच्या राजधानी दिल्लीत बोलविण्यात आले होते. निमंत्रित करण्यात आलेल्या या निवडक 174 शिक्षण संस्थांपैकी 25 संस्था पुरस्कारासाठी निवडण्यात आल्या. या पैकी स्वच्छता मानांकनात विद्या प्रतिष्ठान बारामतीच्या आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेजला देशात दुसरे स्थान मिळाले. यामध्ये कॉलेज, विद्यापीठ, टेक्निकल इन्स्टिट्यूट, आणि सरकारी संस्थांचा समावेश आहे.
या विभागात तामिळनाडूच्या कोंगू आर्ट आणि सायन्स कॉलेज अव्वल स्थानावर राहिले. बारामतीचे आर्टस, सायन्स ॲण्ड
कॉमर्स कॉलेजला दुसरे मानांकन तर चेन्नईतील रामकृष्ण मिशन विवेकानंद कॉलेजचा तिसरा क्रमांक आला.
आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेजच्या या कामगिरीने विद्याप्रतिष्ठानच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब, माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, सुनेत्रावहिनी पवार यांच्या मार्गदर्शनामुळे महाविद्यालयाला हे यश लाभले. या स्वच्छता अभियानात संस्थेचे सर्व विश्वस्त महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा आहे. कॉलेजच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कॉलेजचे अभिनंदन होत आहे.