पुणे, दोन गुन्हेगारांच्या भांडणात तडीपार गुन्हेगाराचा खुन करुन पसार झालेल्या सराईत गुन्हेगारास दत्तवाडी पोलिसांनी अटक केली.या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि, अक्षय राम गायकवाड (रा. आंबील ओढा वसाहत, राजेंद्रनगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या घटनेत सूरज भालचंद्र यशवद (वय 23, रा. राजेंद्रनगर, लोकमान्यनगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सूरज यशवदा हा विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आहे.
त्याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला शहरातून तडीपार करण्यात आले होते, तर अक्षय गायकवाड हा दरोडा व इतर अनेक गंभीर गुन्ह्यांमधील गुन्हेगार आहे. सूरज व अक्षय या दोघांची येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असतानाच ओळख झाली होती. अक्षय हा कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता, तर सूरज हा तडीपार आदेशाचा भंग करून शहरात आला होता. दोघेही रविवारी रात्री अंबिल ओढा येथे भेटले होते. त्याचवेळी दोघांमध्ये कोण मोठा गुन्हेगार? यावरून वाद झाला होता. त्यानंतर अक्षयने सुरजचा चाकूने वार करून खून केला.
या प्रकरणाचा तपास दत्तवाडी पोलिस ठाण्याचे तपास पथक करीत होते. त्यावेळी सुरेश यशवद याचा खून करून पसार झालेला आरोपी अक्षय गायकवाड हा म्हात्रे पुलाजवळ कोणाची तरी वाट पाहत थांबला असल्याची खबर पोलिस कर्मचारी सुधीर घोटकुले यांना मिळाली. त्यानुसार बुधवारी सायंकाळी साडे पाच वाजता पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, पोलिस कर्मचारी कुंदन शिंदे, महेश गाढवे, सागर सुतकर, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर यांच्या पथकाने आरोपी सापळा रचून अटक केली.

