पुणे – शहरातील मुळा आणि मुठा नदीतील जलपर्णी हटविण्यासाठी जैविक पद्धतीचा वापर करावा, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी शुक्रवारी सांगितली.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ आणि शहरातील विविध प्रलंबित विषयांबाबत आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि आयुक्त विक्रम कुमार तसेच पालिकेतील अन्य अधिकारी यांची विस्तृत बैठक आज (शुक्रवारी) झाली. या बैठकीची माहिती देताना आमदार शिरोळे यांनी सांगितले की, विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२ मध्ये दिनांक ८ मार्च रोजी पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरातील नद्यांमधील जलपर्णीच्या त्रासासंबंधीची लक्षवेधी सूचना मांडली होती. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीतील जलपर्णी हटविण्यासाठी जैविक पद्धतीचा वापर करण्यात आला होता. याच धर्तीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील जलपर्णी हटवावी, अशी माझी मागणी होती. त्याला अनुसरून लवकर कार्यवाही करण्याचे आदेश पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी दिले.
नदीकाठच्या धार्मिक स्थळांनी निर्माल्य आणि मूर्तीवर प्रदान केलेले सजावटीचे साहित्य याची जबाबदारी घ्यावी. सर्व वस्तूंचे विलगीकरण करुन ओले निर्माल्य धार्मिक स्थळांच्या जागेतच जिरवावे. याकरिता महापालिकेकडून सीएसआर फंडातून तरतूद करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. शहरातील अस्तित्वात असलेल्या विहिरींचे सर्वेक्षण आणि संरक्षण आणि नवीन विहिरींचे संवर्धन याकरिता कायम स्वरुपी धोरण ठरवून त्याच्या अंमलबजावणीची मागणी आमदार शिरोळे यांनी केली.
वस्ती भागातील स्वच्छतागृहे स्वच्छ आणि सुविधायुक्त ठेवावीत, तसेच शहरातील बंद अवस्थेतील इ-टॉयलेट्सही तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. ‘आपली शाळा, सुंदर शाळा’ असे अभियान मी सुरू केले. शाळा सुंदर रहाण्याच्या दृष्टीने निधीची तरतूद करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
शिवाजीनगर मतदारसंघातील भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, डेक्कन जिमखाना कॉलनी यांना जोडणाऱ्या गल्ल्यांमधील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. तेथील खड्ड्यांमुळे अपघात होतात तरी, ते खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली.
पंजाब नॅशनल बँक ते मेडी पॉईंट, शिवालय अपार्टमेंट, ग्रीन पार्क सोसायटी, औंध येथील पाणीपुरवठा समस्या सोडवावी, घोले रस्ता येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिळणारी प्रत्यक्ष लाभ हस्तांतराची रक्कम देण्यात यावी. वसतीगृहातील गैरसोयी दूर व्हाव्यात, अशाही मागण्या आमदार शिरोळे यांनी केल्या आहेत.
बालभारती ते पौड फाटा रस्ता प्रकल्पास गती देण्यात यावी. येरवडा येथील स्व.बिंदूमाधव बाळासाहेब ठाकरे चौक येथील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन चौकात उड्डाणपूल बांधावा किंवा ग्रेड सेपरेटर करावा, असेही आमदार शिरोळे यांनी सुचविले. अपघात टाळण्यासाठी महापालिका हद्दीतील ब्लॅक स्पॉटबाबत उपाययोजना कराव्यात असेही आमदार शिरोळे यांनी सांगितले.
भारतरत्न पं.भीमसेन जोशी प्रेक्षागृहात बऱ्याच असुविधा असल्याचे लक्षात आले आहे. आयुक्तांनी त्यात लक्ष घालून सुधारणा घडवाव्यात, असेही आमदार शिरोळे यांनी बैठकीत सांगितले.

