मुंबई- राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिम समाजाला शिक्षणात 5 टक्के आरक्षण देणार अशी घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप यावर चर्चा सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर आता त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ”मुस्लीम आरक्षणाला विरोध असेल तर उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं”, असं आव्हान फडणवीसांनी दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत पत्रकारांशी बोलताना म्हटले की, “विधानपरिषदेच्या चर्चेत शासनाच्यावतीन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी 5 टक्के मुस्लिम आरक्षण देणार असल्याची घोषणा केली. पण या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे मत वेगळे असेल तर पत्रकार परिषदेत त्यांनी बोलून ते स्पष्ट कराव. नवाब मलिक यांनी आज शासनातर्फे अधिकृतपणे 5 टक्के मुस्लिम आरक्षणाबाबत मत मांडलं आहे. त्यामुळे आमच्यापर्यंत मुस्लिम आरक्षणाचा विषय आलेला नाही, असे गोलगोल उत्तर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत देण्याऐवजी विधान परिषदेत माडांवे,” असे फडणवीस म्हणाले
पुढे ते म्हणाले की, “तुमच्या; मंत्र्यांनी विषय मांडला आहे. 50 टक्केच्या मर्यादेत आरक्षण दिलs तर ओबीसी आरक्षणावर त्याचा परिणाम होईल. त्याच्याबाहेर आरक्षण दिले तर मराठा आरक्षणावर त्याच्या परिणाम होईल. त्यामुळे हे संविधानाअंतर्गत आरक्षण नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. गोलमोल भूमिका घेऊन चालणार नाही. मुख्यमंत्र्यांना माझे आव्हान आहे की, त्यांनी स्पष्टपणे सांगावे की, त्यांच्या नेतृत्वातले सरकार मुस्लिम आरक्षणाचा कायदा आणणार नाही”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

