पुणे : ‘कोरोना विषाणू किंवा ‘निसर्ग’ चक्रीवादळासारख्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महावितरणच्या महिला अभियंता, अधिकारी, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी अत्यंत कणखरपणे व जिद्दीने कर्तव्य बजावले आहे. कामाच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत, त्याचा आम्हाला अभिमान आहे’, असे गौरवोद्गार पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात काढले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमिवर पुणे परिमंडलात वेबिनारद्वारे जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य अभियंता श्री. तालेवार बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, पंकज तगलपल्लेवार, प्रकाश राऊत, विजय भाटकर तसेच सहायक महाव्यवस्थापक ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन), माधुरी राऊत (वित्त व लेखा), कार्यकारी अभियंता बिना सावंत यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात शहरी व ग्रामीण भागातील सुमारे 145 महिला अभियंता, अधिकारी, तंत्रज्ञ व कार्यालयीन कर्मचारी वेबिनारद्वारे सहभागी झाले होते. अनेक महिला अधिकारी, अभियंता, तंत्रज्ञांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. दररोज 24 तास सुरळीत वीजपुरवठ्याची सेवा देण्यासाठी महावितरणमध्ये काम करताना विविध जबाबदाऱ्या व त्या पूर्ण करतानाचे अनुभव त्यांनी व्यक्त केले. यावेळी पाहुण्यांनी या सर्वांचे कौतुक व कामाचा गौरव करीत मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक अभियंता सौ. जया केवलिया यांनी तर सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता सौ. शैलजा सानप व श्री. संतोष पाटणी यांनी केले. वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन) सौ. अपर्णा माणकीकर व सौ. सोनाली राठोड यांनी गाणे सादर केले. उपकार्यकारी अभियंता सौ. अनुपमा कुद्रे यांनी आभार मानले. पुणे परिमंडल अंतर्गत विविध कार्यालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचे महिला दिनानिमित्त शुभेच्छापत्र व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

