रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरु
पुणे, : थकबाकीमुक्तीसाठी सुरु असलेल्या ‘नवप्रकाश’ योजनेतील थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा भरणा करण्यासाठी वीजग्राहकांकडून गुरुवारपर्यंत (दि. 24) जुन्या पाचशे व एक हजार रुपयाच्या नोटा महावितरण स्वीकारणार आहे.
दरम्यान, पुणे परिमंडलातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्र वीजग्राहकांच्या सोयीसाठी रविवारी (दि. 20) कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार दि. 24 नोव्हेंबरपर्यंत घरगुती व वैयक्तिक ग्राहकांच्या वीजबिलासाठी जुन्या नोटा महावितरण स्वीकारणार आहे. यात थकबाकीमुक्तीसाठी सुरु असलेल्या ‘नवप्रकाश’ योजनेतील थकीत वीजबिलांसाठीही जुन्या 500 व एक हजार रुपयांच्या नोटा वीजबिल भरणा केंद्गात स्वीकारण्यात येणार आहे. ‘नवप्रकाश’ योजनेतील वीजग्राहकांना मूळ थकबाकीची रक्कम भरण्यासाठी येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत 5 टक्के सूट देण्यात आलेली आहे, हे विशेष. याशिवाय इतर वीजग्राहकांना थकबाकी तसेच चालू महिन्यांचे वीजबिल भरण्यासाठी जुन्या 500 व एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत.
ग्राहकाचे वीजबिल जेवढ्या रकमेचे आहे तेवढ्याच रकमेच्या जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात येईल व वीजबिलापोटी आगाऊ स्वरुपात (अॅडव्हान्स पेमेंट) स्वीकारण्यात येणार नाही. रविवारी (दि. 20) वीजग्राहकांच्या सोयीसाठी पुणे परिमंडलातील वीजबिल भरणा केंद्ग कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे. याशिवाय घरबसल्या ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठी महावितरणचे www.mahadiscom.in संकेतस्थळ व मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.


