पुणे – पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह पुणे ग्रामीण मंडलमधील वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीच थकबाकीदार 9520 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून या वर्गवारीतील 18,990 थकबाकीदारांनी 22 कोटी 91 लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला आहे.
महावितरणकडून सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगात सुरु आहे. यामध्ये प्रामुख्याने मोठ्या रकमेचे थकबाकीदार असणाऱ्या वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांविरुद्ध ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.
गेल्या महिन्याभरात पुणे शहरातील वाणिज्यिक व औद्योगिक 5281 ग्राहकांचा वीजपुरवठा 5 कोटी 29 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला. तर 6648 थकबाकीदारांनी 8 कोटी 55 लाख रुपयांचा भरणा केला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील 2317 थकबाकीदारांचा 2 कोटी 56 लाखांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला तर 6641 थकबाकीदारांनी 5 कोटी 74 लाख रुपयांचा भरणा केला आहे. पुणे ग्रामीण मंडलमधील मुळशी, वेल्हे, मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील 1922 ग्राहकांचा 2 कोटी 42 लाखांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला तर 5701 ग्राहकांनी 8 कोटी 62 लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.
तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे किती रक्कम थकलेली आहे हे न पाहता नियमांच्या अधीन राहून या सर्वच थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.
चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्र, ई–वाॅलेटची सोय उपलब्ध आहे. तसेच चालू व थकीत वीजबिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल ऍ़पद्वारे ‘ऑनलाईन‘ सोय उपलब्ध आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी संपूर्ण थकीत रकमेचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणकडून मीटर रिडींगचे वाचन दरमहा ठराविक दिवशी व एसएमएसद्वारे पूर्वमाहिती देऊन केले जात आहे. यासोबतच वीजबिलांची रक्कम, वापरलेले युनिट, वीजबिल भरण्याची मुदत आदींच्या माहितीसह वीजबिलांचा भरणा करण्यासाठी स्मरण देणारा संदेश ‘एसएमएस‘द्वारे ग्राहकांना पाठविला जात आहे. वीजबिल भरण्याची मुदत उलटून गेल्यानंतर नियमाप्रमाणे नोटीसदेखील ‘एसएमएस‘द्वारे दिली जात आहे.

