महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव
हैद्राबाद -– जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर – वांगणी परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील १०५० प्रवाशांची प्रशासनाने बचाव कार्य करून सुखरूप सुटका केली होती. याकामी त्यावेळी या रेल्वेतून कोल्हापूरला जाण्यासाठी प्रवास करणारे व सध्या प्रकाशगड बांद्रा येथे कार्यरत असलेले महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांनी आपल्या जनसंपर्क कामाच्या अनुभवाच्या अनुषंगाने दाखविलेले प्रसंगावधान महत्वाचे ठरले होते.
विश्वजित भोसले यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हजारो प्रवाशांच्या जीवावर बेतलेल्या या घटनेची माहिती तात्काळपणे प्रशासन व पत्रकार यांच्यापर्यंत पोहोचवली होती. आपला जनसंपर्क कामाचा अनुभव पाठीशी असणारे विश्वजित भोसले यांनी ट्विटर, व्हाटस्अॅप इत्यादी सोशल मीडियाचा यासाठी अत्यंत प्रभावीपणे वापर केला होता. ज्यामुळे प्रवाशांवर ओढवलेल्या या जीवघेण्या प्रसंगाची अचूक व तात्काळ माहिती प्रशासनातील अधिकारी व पत्रकारांपर्यंत पोहचली होती. ज्यामुळे बचावकार्यास गती मिळून प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यास मोलाची मदत झाली होती. त्यांच्या या महत्वपूर्ण कार्याची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया या देशातील जनसंपर्क क्षेत्रातील शिखर संस्थेकडून विश्वजीत भोसले यांच्या या कार्याचा हैद्राबाद येथे सत्कार करण्यात आला. पीआरएसआय च्या ४१ व्या परिषदेत तेलंगणाचे पर्यटन व सांस्कृतिक मंत्री व्ही श्रीनिवासन गौड यांच्या हस्ते गौरवपत्र देवून हा गौरव करण्यात आला. यावेळी पीआरएसआयचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित पाठक, माजी राष्ट्रीय अध्यक्ष समीर गोस्वामी, सचिव निवेदिता बॅनर्जी, हैद्राबाद चॅप्टरचे अध्यक्ष वेणूगोपाल रेड्डी, उत्तराखंड राज्याच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी कौन्सिल चे डायरेक्टर जनरल राजेंद्र डोभल आदी मान्यवर उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे दि. २७ जुलै २०१९ रोजी ठाणे जिल्ह्यात उल्हास नदीला पूर आल्याने या नदीच्या जवळून जाणारा रेल्वे ट्रॅक पुराच्या पाण्याखाली गेला होता. तुफान पाऊस व पूराच पाणी रेल्वे रुळांवर आल्यामुळे या मार्गावरून कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस त्या रात्री सुमारे सव्वा दहा पासून तब्बल १५ तास पुराच्या पाण्यात अडकून पडली होती. यावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विश्वजित भोसले यांनी आपल्या जनसंपर्क कौशल्याचा पुरेपूर वापर करत रेल्वे प्रशासन, मंत्रालयातील अधिकारी व पत्रकारांशी संपर्क साधण्यास सुरवात केली. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत रेल्वेतील सत्य परिस्थितीचे चित्रण करून ते प्रशासन व पत्रकार यांच्यापर्यंत पोहचविले. त्यामुळे रेल्वे प्रशासन, इनडीआरएफ टीम, देशभरातील विविध वृत्तवाहिन्या, दैनिक यांना मोलाची माहिती उबलब्ध होऊन बचत कार्यास मोठी गती मिळाली होती.
रेल्वेतील प्रवाशांशी संपर्क साधून आपल्याला मदत मिळेल असा त्यांना धीर देत विश्वजित भोसले यांनी रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांची माहिती, गरजेनुसार प्रवाशांचे फोटो आणि व्हिडीओ चित्रण करून ते सोशल मीडियावर पाठविले. ते सर्व व्हिडीओ, प्रवाशांच्या मुलाखती आणि फोटो देशभरातील विविध वृत्तवाहिन्या आणि विविध माध्यमांनी दिवसभराच्या बातम्यांसाठी वापरले होते.
विश्वजित भोसले यांच्या या कामगिरीमुळे विविध मिडिया हाउसेसना महालक्ष्मी एक्स्प्रेस मधील बातम्यांची सत्य परिस्थिती लोकांपर्यंत पोहचण्यास मदत झाली. त्यामुळे अशा परिस्थितीत सोशल मिडीयावरून पसरवल्या जाणाऱ्या अफवांना पायबंद बसला. तसेच ज्या प्रवाशांचे कुटुंबीय या सर्व प्रसंगांनी घाबरून गेले होते त्यांना देखील दिलासा मिळाला होता.
एक सतर्क नागरिक आणि एक तरुण जनसंपर्क अधिकारी म्हणून विश्वजित भोसले यांची ही कामगिरी लाक्षणिक ठरली आहे. विविध स्तरातून त्यांच्या या कार्याचे कौतुक करण्यात आले होते. समाजाने केलेल्या कौतुकाचा मी ऋणी असून जनसंपर्क क्षेत्रात देशात शिखर संस्था असलेल्या पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेकडून माझ्या या कार्याची राष्ट्रीय पातळीवर नोंद घेण्यात आली व मला गौरविण्यात आले याचा देखील मला महावितरणचा जनसंपर्क अधिकारी म्हणून विशेष अभिमान असल्याची भावना यावेळी विश्वजित भोसले यांनी व्यक्त केली.