बेकायदेशीर केबल काढून टाकण्याचे आवाहन
पुणे : महावितरणच्या लघु व उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांशी समांतर व वीजखांबांच्या आधारे टाकलेल्या अनधिकृत खाजगी केबलमुळे विद्युत अपघाताची शक्यता आहे. केबल ऑपरेटरर्सनी केबल्स तात्काळ काढून टाकाव्यात असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तसेच अशा अनधिकृत केबल्स आढळून आल्यास त्या विनाविलंब हटविण्याची जबाबदारी संबंधित अभियंते व जनमित्रांवर देण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेतील वीजखांब, वीजवाहिन्या, रोहित्र आदी ठिकाणी केबल टाकणे बेकायदेशीर आहे. या केबल्समुळे वीजपुरवठ्यात अडथळा येणे, विद्युत अपघातांची शक्यता असल्याने वीज कर्मचारी किंवा नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होणे तसेच महावितरणच्या वीजयंत्रणेचे किंवा आर्थिक नुकसान होणे या बाबींचा विचार करून मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने सन 2006 मध्ये महावितरणच्या यंत्रणेवरील अनधिकृत केबलचे जाळे हटविण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याप्रमाणे वीजयंत्रणेवरील केबल हटविण्यासाठी महावितरणकडून कारवाई सुरु आहे. फक्त ‘महानेट’ या ग्रामीण इंटरनेट जोडणी प्रकल्पाच्या केबल जिथे उपरी मार्गाद्वारे नेल्या आहेत अशा ठिकाणी महावितरणचे वीजखांब व संबंधीत पायाभूत सुविधा वापरास शासनाने परवानगी दिली आहे.
मात्र वीजयंत्रणेवरील अनधिकृत केबलमुळे विद्युत अपघात झाल्याचे प्रकार दिसून आल्याने महावितरणने संबंधीत शाखा अभियंता व जनमित्रांवर केबल काढून टाकण्याची जबाबदारी निश्चित केली आहे. याशिवाय अनधिकृत केबल टाकणे किंवा त्यामुळे जिवितहानी, मालमत्तेचे नुकसान झाल्यास केबल ऑपरेटर विरोधात फौजदारी तक्रार करण्यासोबतच नुकसानभरपाईचा दावा देखील करण्यात येणार आहे. केबल हटविण्यासंदर्भात उपविभाग व विभाग प्रमुख अभियंत्यांवर तपासणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तपासणी दरम्यान वीजयंत्रणेवर केबल आढळून आल्यास संबंधित शाखा अभियंता व जनमित्रांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.