पुणे : पुणे शहरातील सर्व पेठांच्या मध्यवर्ती परिसरातील 98 टक्के तर लुल्लानगर, कोंढवा, गुलटेकडी, कॅम्प, स्वारगेट, मंडई, लक्ष्मी रोड, सिंहगड रोड आदी परिसरातील 100 टक्के भागात खंडित झालेला वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून शनिवारी (दि. 2) सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु करण्यात आला आहे. यातील दुपारी अडीच वाजेपर्यंत सुमारे 70 टक्के भागात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता.
पुणे महानगरपालिकेच्या खोदकामात महापारेषण कंपनीची 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तोडल्याने महापारेषणच्या रास्तापेठ जीआयएस 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा आज सकाळी 11.33 वाजता बंद पडला आहे. त्यामुळे महावितरणच्या 6 उपकेंद्रांचाही वीजपुरवठा खंडित झाला होता. यामध्ये पर्वती, बंडगार्डन, शिवाजीनगर, पद्मावती व रास्तापेठ विभागातील सुमारे 2 लाख वीजग्राहकांना फटका बसला. पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यासाठी मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे यांच्यासह अभियंते व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर तांत्रिक उपाययोजना सुरु केली. यामध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने रास्तापेठ विभागातील नाना पेठ, रास्तापेठ, भवानी पेठ, दारुवाला पुल, रविवार पेठ, गणेश पेठ आदी परिसर वगळता उर्वरित सर्वच 100 टक्के भागांमध्ये पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. रास्तापेठ विभागामध्ये वीजपुरवठा खंडित असलेल्या परिसरात रात्री उशिरापर्यंत पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात येत आहे.

