पुणे, दि. 27 सप्टेंबर 2018 : सिंहगड रस्त्यावर मुठा कालवा फुटून जनता वसाहत व परिसरातील अनेक घरांत पाणी शिरल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून महावितरणकडून चार रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 28) सकाळी सर्व घरांची पाहणी करून वीजपुरवठा सुरु करण्यात येणार आहे.
मुठा उजवा कालवा गुरुवारी (दि. 27) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास फुटल्यानंतर जनता वसाहत व परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. सार्वजनिक तसेच घरांमधील विजेचा धोका टाळण्यासाठी महावितरणने या परिसराला वीजपुरवठा करणार्या वाघजई व पेशवेपार्क या दोन्ही 11 केव्ही वाहिन्यांचा वीजपुरवठा तातडीने बंद केला. पाणी ओसरल्यानंतर दीड तासांनी तो पूर्ववत करण्यात आला. मात्र जनता वसाहत व परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून चार रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे 500 घरांचा वीजपुरवठा बंद आहे. या घरांमध्ये पाणी आहे. वीजमीटर भिजले आहे. भिंतींना ओल आली आहे. भिंतीची पडझड झाली आहे. त्यामुळे वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. महावितरणचे सुमारे 20 अभियंते व जनमित्र आज या परिसरात कार्यरत होते. कालव्यातील पाण्यामुळे वीजधोके टाळण्यासाठी त्यांच्याकडून उपाययोजना करण्यात आल्या.
दरम्यान शुक्रवारी (दि. 28) सकाळी महावितरणचे सुमारे 30 अभियंते व जनमित्र आवश्यक साहित्यांसह परिसरातील घराघरांत जाऊन वीज यंत्रणेची पाहणी करणार आहेत. सुरक्षिततेसाठी आवश्यक दुरुस्तीचे काम व उपाययोजना केल्यानंतरच संबंधीत घरांमधील वीजपुरवठा सुरु करण्यात येणार आहे.

