पावसाळ्यात विजेचे धोके टाळा

Date:

येत्या काही दिवसांतच मान्सूनच्या पावसाला सुरवात होईल. पाऊस आला की वीजपुरवठा खंडित होतो. मुसळधार पाऊस नसताना किंवा वादळ नसताना वीजपुरवठा खंडित का होतो, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. यामागे वीज वितरण यंत्रणेवर उन-पावसाचा काय परिणाम होतो, हे जाणून घ्यावे लागेल. यासोबतच पावसाळ्यातील दिवसांत घरातील विजेची उपकरणे किंवा सार्वजनिक ठिकाणी असलेली वीजयंत्रणा यापासून सतर्क राहण्याची गरज आहे. याबाबत सुद्धा सावध राहण्याची गरज आहे.

वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे

वीज खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पीन किंवा डीस्क इन्सूलेटर (चिमणी) तसेच डीपी स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सूलेटर हे चिनीमातीचे असतात. वीजप्रवाह वितरण यंत्रणेच्या लोखंडी खांबात उतरू नये, यासाठी हे इन्सूलेटर अतिशय महत्वाचे असतात. उन्हाळ्यात चिनीमातीचे हे इन्सूलेटर तापतात. त्यानंतर पावसाचे दोन-चार थेंब पडले की इन्सूलेटरला तडे जातात. त्यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते व वाहिनीमधील वीजप्रवाह खंडित होतो.

भूमिगत वाहिन्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी खोदकाम केले जाते. यात भूमिगत वाहिन्यांना धक्का बसतो. उन्हाळ्यात त्यावर काही परिणाम होत नाही. परंतु, पावसाला सुरवात झाली की पाणी या वाहिन्यांमध्ये शिरते व वाहिनीत बिघाड होतो. संततधार पावसामुळे भूमिगत वाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. केबल टेस्टींग व्हॅनच्या सहाय्याने भूमिगत वाहिन्यांमधील दोष शोधला जातो. दोष आढलेल्या ठिकाणी खोदकाम करणे, केबलमधील आर्द्रता काढणे, जाईंट करणे आदी कामे करावी लागतात. पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीत या कामांमध्ये व्यत्यय येत असल्याने वीजग्राहकांची विजेअभावी गैरसोय होते.

वीजपुरवठा खंडित होण्याचे आणखी कारणे म्हणजे वीज यंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, वीज कोसळणे किंवा तिच्या कडकडाटाने दाब वाढणे आदींमुळे वीजपुरवठा खंडित होतो. फिडर पिलर, रिंगमेन युनिट आदी आदी यंत्रणेत पाणी शिरते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. खोलगट व सखल पावसाचे पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रोहित्राचा वीजपुरवठा बंद करून ठेवावा लागतो.

विजेपासून सावधान!

वीज दिसत नाही, पण परिणाम मात्र जीवघेणे असतात. विजेपासून प्रामुख्याने पावसाळ्यात सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे तसेच पाणी हे विजेचे चांगले वाहक असल्याने विविध दुर्घटना घडतात. त्यामुळे जिवितहानीचा धोका निर्माण होतो. तो टाळण्यासाठी सतर्कता हीच सुरक्षितता हाच सर्वोत्तम उपाय आहे.

पावसाळ्यात वादळवाऱ्यामुळे वीजतारांमध्ये घर्षण होण्याची शक्यता असते. त्यामुळे विजेचे खांब, विजेच्या तारा व रोहित्रे (Transformer) यातून ठिणग्या पडत असतात अशावेळी महावितरणच्या नजिकच्या कार्यालयाला त्वरित कळवावे. कारण अशा ठिणग्यांतून वीजतारा तुटून किंवा आग लागून मोठी दुघर्टना घडण्याची शक्यता असते.

 

खबरदारी हीच सुरक्षितता !

पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळयात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते. त्यादृष्टीने पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी विद्युत उपकरणांना पाणी लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. विशेषतः मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्वीच बंद करावे व तात्काळ महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधून मिटरची जागा बदलून घ्यावी. पावसाळ्यात घरातील कोळी, किटक, पाल, झुरळ, चिमण्या उबदार जागा म्हणून मीटर तसेच स्वीच बोर्डचा आश्रयाला येतात, त्यामुळे शॉटसर्किट होऊ शकते. त्यादृष्टीनेही खबरदारी घ्यावी.

पावसाळयात विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस व अशा विद्युत उपकरणांना हात लावू नये. तसेच ओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे वीज उपकरणे अशा ओलाव्यापासून दूर ठेवावीत. तसेच अशी उपकरणे खिडकी तसेच बाल्कनीपासून दूर असावीत. जेणेकरुन त्यात पाणी जाणार नाही. विद्युत उपकरणावर पाणी पडले अथवा त्यात पाणी शिरले तर ते उपकरण त्वरित बंद करून ते मूळ वीज जोडणीपासून बाजूला करावे. त्यामुळे त्या उपकरणातून शॉक लागण्याची शक्यता राहणार नाही. कपडे वाळत घालण्यासाठी लोखंडी तार वापरू नये तसेच ही तार विजेच्या खांबाला किंवा यंत्रणेला बांधू नये.

मेनस्विचमध्ये फ्यूज वायरच असावी

घराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये व त्याच्या शेजारी असलेल्या किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अल्यूमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे. अशी फ्यूज वायर वीजभारानुसार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो. तांब्याची एकेरी, दुहेरी वेढ्याची तार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीज खंडित होत नाही व मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते.

उपाययोजनाही महत्वाच्या!

वीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या तारांची स्थिती योग्य असल्याबाबतची खात्री अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून करून घ्यावी व घरातील वीजजोडणीसाठी लागणारे साहित्य आय.एस.आय. प्रमाणित असावे. सर्व वीज उपकरणांची अर्थींग योग्य असल्याबाबतची खबरदारी घ्यावी. योग्य अर्थींगमुळे शॉकची तीव्रता कमी होते तसेच उच्च दाब असलेल्या मिक्सर, हिटर, गिझर, वातानुकूलित यंत्र, फ्रिज या उपकरणांसाठी थ्री पिन सॉकेटचाच वापर करावा. अशा थ्री पिन सॉकेटमध्ये अर्थिंगची व्यवस्था असते.

आकाशातील विजेचा कडकडाट होत असेल तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून ते मूळ वीज कनेक्शनपासून बाजूला करावी. वीज पडल्यास त्या भागातील विद्युत प्रवाहाचा उच्चदाब वाढून विद्युत उपकरणांचे मोठया प्रमाणात नुकसान होवू शकते. अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तसेच घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी.

अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहजशक्य आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्‍या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. पूर किंवा अतिवृष्टीमुळे तसेच नदीकाठच्या परिसरात कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि वीजपुरवठा बंद करावा लागतो.

काय करू नये!

विद्युत खांबांना व तणाव तारेला (स्टेवायर) जनावरे बांधू नयेत. त्यास दूचाकी टेकवून ठेऊ नयेत किंवा विद्युत खाबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. कपडे वाळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारांचा वापर टाळावा. कारण अनावधानाने ही तार वीजप्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आली तर मोठी दुर्घटना होऊ शकते. घरातील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावे. विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणार्‍या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

विद्युत उपकरणांची दुरुस्ती करताना मेन स्वीच बंद करावा. दुरुस्तीदरम्यान पायात रबरी चपला घालाव्यात व पायाखालची जमीन ओलसर असू नये याची खबरदारी घ्यावी. वायरची जोडणी करताना एकच वायर तुकड्या-तुकड्यात जोडू नये. तसेच वायरची जोडणी करावीच लागली तर त्यावर इन्सुलेशन टेप लावावी.

वीज ही अत्यावश्यक गरज आहे. मात्र त्या विजेचा वापर सुरक्षिततेची खबरदारी घेऊन योग्यप्रकारे केला तरच ती उपयोगी ठरु शकते. अन्यथा दुर्घटना घडून वीज अतिधोकादायक होऊ शकते. त्यामुळे वीजग्राहकांनी पावसाळ्यात विद्युत उपकरणे हाताळताना अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

अभियंते व जनमित्रांची कसोटी

पावसाळ्यात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंते व जनमित्रांची खर्‍या अर्थाने कसोटी असते. प्रतिकूल परिस्थितीत रात्री-बेरात्री दुरुस्तीचे काम करण्याचे काम अतिशय आव्हानात्मक असते. वीज दिसत नाही तसेच ती अनुभवी किंवा नवख्या कर्मचार्‍यांना ओळखतही नाही. त्यामुळे धोका सर्वांना सारखाच असतो. भरपावसात, रात्री-बेरात्री खंडित विजेचे तांत्रिक दोष शोधणारे, दुरुस्तीचे काम करणारे महावितरणचे अभियंते व जनमित्र यांच्यासाठी पावसाळा अतिशय आव्हानात्मक असतो.

टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध

शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्गाचे 1912 किंवा 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 हे टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री क्रमांकावर वीजग्राहकांना वीजसेवेविषयक तक्रार दाखल करता येते. यासोबतच अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना ग्राहक क्रमांकासोबत स्वतःचा मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड करण्याची सुविधा आहे. त्यासाठी कॉल सेंटरवर किंवा 92255-92255 या मोबाईल क्रमांकावर (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून एसएमएस केल्यास संबंधीत ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी होणार आहे. ग्राहकांना रजिस्टर्ड मोबाईलवरून तक्रार नोंदविण्यासाठी कॉल सेंटरशी संपर्क साधून केवळ तक्रारीचा तपशील सांगावा लागतो.

निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी (महावितरण ),पुणे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...