मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांचे भावनिक आवाहन
पुणे : महावितरणचे कर्मचारी म्हणून कोणतेही प्रलोभन समोर आल्यावर कंपनीसह सर्वप्रथम कुटुंबिय व सगेसोयऱ्यांचा विचार करून त्यास स्पष्ट नकार द्यावा. स्वतःशी व महावितरणशी प्रामाणिक राहून वीजसेवेचे आपले कर्तव्य, जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात असे भावनिक आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनी शनिवारी (दि. 03) केले.
येथील रास्तापेठ कार्यालयाच्या प्रांगणात पुणे शहरातील सर्व अभियंता, अधिकारी, जनमित्र व कार्यालयीन कर्मचारी यांच्याशी थेट हितगूज करताना मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. महेंद्र दिवाकर, श्री. सुंदर लटपटे, श्री. राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे म्हणाले की, सार्वजनिक सेवा क्षेत्रातील महावितरणमध्ये काम करताना ग्राहकसेवा हेच आपले सर्वोच्च कर्तव्य आहे. ते पारदर्शकपणे व प्रामाणिक राहूनच बजावले पाहिजे. कुटुंबियांच्या गरजा पूर्ण होतील एवढे वेतन महावितरणकडून प्रत्येकाला मिळत आहे. पण त्यानंतरही प्रलोभनांना बळी पडल्यास सर्वप्रथम वाताहत संबंधीत कर्मचार्यांच्या कुटुंबियाची होते, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्याच्या कुटुंबियाचे भावविश्व उद्ध्वस्थ होते. घरातील हसणे खिदळणे संपुष्टात येते. मानसिक तणाव वाढतो व न्यूनगंडही निर्माण होतो. सोबतच समाजात अप्रतिष्ठा होते. सगेसोयरे अंतर ठेऊन राहतात. महावितरणचीही जनमानसात प्रतिमा मलीन होते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी प्रामाणिकपणे काम करून ग्राहकांमध्ये स्वतः व कंपनीबद्दलचा चांगुलपणा निर्माण करावा असेही त्यांनी सांगितले. लोभ असला तर तो आपले आईवडील, कुटुंबिय, सगेसोयऱ्यांबद्दल ठेवावा. वाईट मार्गावर नेणारे प्रलोभन किंवा लोभ हे क्षणिक असले तरी त्याचे परिणाम स्वतःसह कुटुंबियांनाही आयुष्यभर भोगावे लागतात. त्यामुळे प्रलोभनांना थारा न देता ग्राहकसेवा किंवा कार्यालयीन कामकाज हे नियमाधीन राहून प्रामाणिकपणे व पारदर्शकपणे करावे, असे आवाहन त्यांनी केले.
संपूर्ण राज्यात पुणे परिमंडल हे थकबाकीमुक्तीचे, उत्कृष्ट व जलद ग्राहकसेवेचे तसेच अखंडित वीजपुरवठ्याचे एक मॉडेल ठरावे या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व अभियंता, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता प्रामाणिकपणे व एकजुटीने काम करावे, अशी साद मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनी दिली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या सादाला एकदिलाने व निर्धारापूर्वक प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात अधीक्षक अभियंता सर्वश्री महेंद्र दिवाकर, सुंदर लटपटे, राजेंद्र पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. पुणे शहरातील थकबाकी शून्य करण्यासोबतच उत्कृष्ट व पारदर्शक ग्राहकसेवेचे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर यांनी केले व आभार मानले. यावेळी विविध कर्मचारी संघटनांचे पुणे शहरातील पदाधिकारी, सर्व कार्यकारी अभियंते, उपविभाग कार्यालयप्रमुखांसह अभियंते, अधिकारी, जनमित्र व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.