मुंबई
महावितरणच्या अतुलनीय कामगिरीतून 70 वर्षांनंतर प्रकाशमान झालेल्या घारापुरी (एलीफंटा) बेटाच्या विद्युतीकरणाचे लोकार्पण पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी, मुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, पर्यटन मंत्री ना. श्री. जयकुमार रावल, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री ना. श्री. रविंद्र चव्हाण, खासदार श्री. श्रीरंग बारणे, आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, मनोहर भोईर, सरपंच श्री. बळीराम ठाकूर, उरण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री. महेश बालदी इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी बेटाच्या विद्युतीकरणामुळे येथील नागरिकांना नव्याने स्वातंत्र्य अनुभवयाला मिळणार आहे, असे सांगितले. तसेच यासाठी मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री व महावितरणच्या अभियंत्यांनी केलेल्या कामाचे त्यांनी कौतूक केले. विद्युतीकरणामुळे निर्माण झालेला झगमगाट अंतरंगातही निर्माण व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे, असे सांगून बेटावरील विद्युतीकरणासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जगातले सर्वोत्तम तंत्रज्ञान शोधून काढले. देशाच्या इतिहासात प्रथमच समुद्र तळाखालून सर्वात लांब 7.5 कि.मी. केबल टाकण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे महावितरणच्या अभियंत्यांनी ज्या अथक परिश्रमाने घारापुरी बेटावर वीज आणली ते कौतुकास्पद आहे, असे गौरोद्वगार मुख्यमंत्र्यांनी काढले. या विद्युतीकरणामुळे घारापुरी बेटावरील पर्यटनाचा विकास होऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील. घारापुरीच्या विकासासाठी राज्यशासनातर्फे संपूर्ण अर्थसहाय्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बेटाच्या विद्युतीकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या भरीव सहकार्याचा आवर्जून उल्लेख केला. राज्यात कुठेही भारनियमन नाही तसेच सौभाग्य योजनेच्या माध्यमातून डिसेंबर 2018 पर्यन्त महाराष्ट्रातील एकही गाव विजेशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही ऊर्जामंत्र्यांनी दिली. या बेटाच्या सभोवताली दोन कोटी रुपये खर्च करून लवकरच एलईडीद्वारे संपूर्ण झगमगाट करण्यात येईल, असेही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी सांगितले.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी प्रास्ताविक करताना सध्या येथे आवश्यक क्षमतेपेक्षा चारपट अधिक वीजपुरवठा करण्याची यंत्रणा महावितरणने कार्यान्वित केली आहे, असे सांगितले तसेच विद्युतीकरणाचे काम अत्यंत अवघड होते, परंतु महावितरणच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी ते उत्तमप्रकारे पूर्ण केले, असे श्री. संजीव कुमार म्हणाले. यावेळी घारापुरी बेटावरील पाच ग्राहकांना प्रातिनिधीक स्वरुपात वीजमीटर वाटप प्रमाणपत्र देण्यात आले.
याप्रसंगी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री. अरविंद सिंह, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त श्री. यु.पी.एस. मदान, रायगडचे जिल्हाधिकारी श्री. विजय सुर्यवंशी यांच्यासह इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कोंकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक श्री. सतीश करपे यांचा सत्कार करण्यात आला.