पुणे : महावितरणच्या पुणे परिमंडलाने आयोजित केलेल्या एकदिवसीय क्रीडा स्पर्धेत प्रादेशिक कार्यालयाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. एम. जी. शिंदे यांच्याहस्ते स्पर्धेतील विजेत्या संघांना व खेळाडूंना बक्षीस प्रदान करण्यात आले.
येथील वाडिया कॉलेजच्या मैदानात शनिवारी (दि. 28) आयोजित क्रीडास्पर्धा शिस्तीत व उत्साहात झाली. महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. एम. जी. शिंदे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून या स्पर्धेचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता श्री. महेंद्र दिवाकर, राजेंद्र पवार यांची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रीय व राज्यस्तरावर प्रतिनिधीत्व केलेल्या महावितरणमधील अनेक दिग्गज खेळाडूंसह सुमारे 140 पुरुष व महिला अधिकारी, कर्मचारी यांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.
या स्पर्धेत प्रादेशिक कार्यालय, गुणवत्ता व नियंत्रण कार्यालय आणि गणेशखिंड मंडल यांच्या संयुक्त संघाने कबड्डी तसेच महिला व पुरुषांच्या बॅडमिंटन, टेबल टेनीस स्पर्धेत विजेतपद मिळविले. इतर वैयक्तिक क्रीडा स्पर्धेतही या संघाच्या खेळाडूंनी वर्चस्व मिळविले. सर्वसाधारण उपविजेतेपद पटकाविलेल्या पुणे परिमंडल, रास्तापेठ मंडलाच्या संयुक्त संघाने व्हॉलीबॉल व क्रिकेटमध्ये विजेतेपद पटकाविले. सायंकाळी झालेल्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात विजेत्या संघांना व खेळाडूंना प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. एम. जी. शिंदे यांच्याहस्ते बक्षिस प्रदान करण्यात आले. स्पर्धेच्या आयोजनासाठी अधीक्षक अभियंता श्री. महेंद्र दिवाकर, श्री. सुंदर लटपटे, श्री. राजेंद्र पवार, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर व सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजेते पुढीलप्रमाणे – कुस्ती – अजित लोखंडे (57 किलो गट), चंद्गकांत दरेकर (61 किलो गट), सुरेश जाधव (65 किलो गट), निखिल केदार (97 किलो गट), गणेश भोकरे (खुला गट). धावस्पर्धा – 100 मीटर – गुलाबसिंग वसावे (पुरुष गट) व – शिल्पा जाधव (महिला गट), पुरुष गटातील धावस्पर्धेत 200 मीटर व 400 मीटर – गुलाबसिंग वसावे, 800 मीटर – वैभव राऊत, 1500 मीटर- भूषण म्हात्रे. लांबउडी – प्रदीप धनवे (पुरुष गट) व संगीता देशमुख (महिला गट). उंचउडी – योगेश गायके व राजेंद्ग हवालदार (पुरुष गट) तर शितल नाईक (महिला गट). गोळाफेक – पांडुरंग धनवट (पुरुष गट) व शितल नाईक (महिला गट). थाळीफेक – ज्ञानेश्वर गुरव (पुरुष गट) व संगीता देशमुख (पुरुष गट). भालाफेक – कल्लेश्वर सांगवे (पुरुष गट) व धनश्री कुबेर (महिला गट). कॅरम – श्री. कांबळे (पुरुष गट) व वर्षा बोपटे (महिला गट) तर बुद्धीबळ स्पर्धेत श्री. नाईकनवरे (पुरुष गट) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.