श्री. संजीव कुमार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महावितरण.
मुंबई: महावितरणच्या मुंबईस्थित प्रकाशगड मुख्यालयात सुरू करण्यात आलेल्या ‘विशेष मदत कक्षा’मुळे ग्राहकांना नवीन वीजजोडणी तत्परतेने मिळत असून ग्राहकांच्या नावातील बदलही करून देण्यात येत आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासाठी हा ‘विशेष मदत कक्ष’ सुरू करण्यात आलेला असून या कक्षाचा ग्राहकांनी जास्तीत जास्त उपयोग करून त्यांच्या समस्यांचे निवारण या कक्षाद्वारे करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
एप्रिल 2017 पासून हा ‘विशेष मदत कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. या कक्षाकडे एप्रिल ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यन्त सुमारे 1,203 ग्राहकांनी संपर्क साधला असून यातील 371 ग्राहकांनी नवीन वीज जोडणीच्या संबंधात चौकशी केली. त्यापैकी 128 ग्राहकांना तत्परतेने नवीन वीजजोडणी देण्यात आलेली आहे. तसेच 832 ग्राहकांनी नावात बदल करण्याबाबत या विशेष कक्षाकडे मदत मागितली. त्यापैकी 54 ग्राहकांच्या नावात तातडीने बदल करून देण्यात आला आहे. याशिवाय या कक्षाद्वारे इतर ग्राहकांच्याही समस्या सोडविण्यात येत आहेत.
याच कक्षामार्फत ऑगस्ट 2017 पासून ‘कनेक्शन ऑन कॉल’ ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेंतर्गत ज्या ग्राहकांनी वीजजोडणीसाठी या कक्षाला दूरध्वनी केला अशा ग्राहकांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजजोडणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या सेवेंतर्गत 83 ग्राहकांनी मदत कक्षाकडे संपर्क साधला. त्यातील 36 ग्राहकांना नवीन वीजजोडणी तत्परतेने देण्यात आली आहे.
नवीन वीजजोडणी, नावात बदल व वीजजोडणी न मिळालेल्या ग्राहकांनी आपली तक्रार सोडविण्यासाठी महावितरण मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे 022-26478989 व 022-26478899 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे.