पुणे, दि. 29 : पुणे शहर व लगतच्या परिसरातील नागरीकरणामुळे येत्या काही वर्षांत विजेची मागणी वाढणार आहे. त्यामुळे वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी तसेच सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी पाच नवीन अतिउच्चदाब उपकेंद्र अतिशय आवश्यक असल्याची गरज महावितरण व महापारेषणच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यासंबंधीचा प्रस्ताव मुख्यालयास पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवना’त पुणे परिमंडलातील महावितरण व महापारेषणच्या यंत्रणेतील समन्वयासाठी मंगळवारी (दि. 29) बैठक झाली. यावेळी महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे, मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे, महापारेषणचे मुख्य अभियंता श्री. रोहिदास मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुणे शहरी व ग्रामीण भागासह औद्योगिक वसाहतींमध्ये वीजयंत्रणेवरील ताण व वीजपुरवठ्याची स्थिती याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. पुणे शहराच्या लगत निर्माणधीन असलेले निवासी, व्यापारी संकुल व औद्योगिकरणामुळे विजेची मागणी वाढणार आहे. त्यासाठी महावितरण, राज्य शासन व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून कामे सुरु झालेली आहेत. परंतु येत्या काही वर्षांतील वीजयंत्रणेवरील ताण पाहता खेड सिटी (कन्हेरसर), सीटीसी (रास्तापेठ), भूगाव, मारुंजे आणि इऑन खराडी याठिकाणी अतिउच्चदाब उपकेंद्रांची गरज असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. या पाचही अतिउच्चदाब उपकेंद्रांचा प्रस्ताव मुख्य कार्यालयास पाठविण्यात येईल, अशी माहिती महापारेषणकडून देण्यात आली.
सद्यस्थितीत असलेल्या महावितरण व महापारेषणच्या वीजयंत्रणेतून पुणे परिमंडलातील सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक समन्वय साधण्याबाबत चर्चा झाली व त्यासंबंधीचे काही निर्णय घेण्यात आले. तसेच महावितरणच्या वीजयंत्रणेवरील वीजभाराचा ताण कमी करण्यासाठी महापारेषणच्या काही उपकेंद्रांत तांत्रिक उपाययोजना करण्याबाबत निर्णय झाले. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात असणाऱ्या अतिभारित वाहिन्यांवरील ताण कमी होणार आहे. याशिवाय चाकण व तळेगाव औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांनाही या उपाययोजनांचा दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी फायदा होणार आहे. या बैठकीला अधीक्षक अभियंता सर्वश्री महेंद्र दिवाकर, सुंदर लटपटे, राजेंद्र पवार, उत्क्रांत पायगुडे व इतर अधिकारी उपस्थित होते.