पुणे, दि. 29 : सध्या पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात संततधार पाऊस सुरु असून तो येत्या दोन-तीन दिवसांत कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमिवर सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनी केले आहे.
गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्यापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. या पावसामुळे संभाव्य वीजअपघात टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजयंत्रणेची पुन्हा एकदा तपासणी करून वीजसुरक्षेबाबत योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी व नसल्यास त्वरीत अर्थिंग करून घ्यावे. वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेल्या पण टेपने जोडलेल्या असल्यास विद्युत प्रवाहापासून अपघाताची शक्यता असते. प्रामुख्याने मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये (टिना) विद्युत प्रवाह येऊ शकता. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सूलेशन टेपने जोड देण्यात यावा. स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी तसेच पावसाच्या पाण्यापासून वीज संचमांडणीही सुरक्षित ठेवावी.
वेगवान हवा किंवा पावसाच्या पाण्यामुळे सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या लाईटिंगचे वायर्स खाली झुकलेले नाहीत किंवा विस्कळीत झालेले नाहीत याची तपासणी करावी. सुरक्षित अंतरापेक्षा ही लाईटिंग अधिक उंचावर असल्याची तपासणी करीत राहावी. सार्वजनिक गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येत भाविकमंडळी श्रीगणेशांच्या दर्शनाला आणि विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी सध्याच्या संततधार पावसामुळे वीजसुरक्षेबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी गणेश मंडपातील वीजयंत्रणेची वायरमनकडून दैनंदिन तपासणी करण्यात यावी.
पावसामुळे शार्टसर्किट होणे किंवा वीजव्यवस्थेत बिघाड होणे व इतर संभाव्य शक्यता लक्षात घेऊन गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी संबंधीत क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. तातडीच्या मदतीसाठी गरज भासल्यास मंडळांनी संबंधित अभियंते, कर्मचारी किंवा महावितरणच्या 24 तास सुरु असणाऱ्या 1912 किंवा 18002003435 किंवा 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.