मुंबई, दि. 10 ऑगस्ट 2017 :
वीज ग्राहकांना वीजमीटर देतांना त्याची नोंद न ठेवणे, कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित थकबाकीदार ग्राहकांना वीजमीटर देणे अशा विविध अनियमितता करणाऱ्या तीन अभियंत्यांवर महावितरणने निलंबनाची कारवाई केली आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या आदेशान्वये मुख्यालयातील अधिकाऱ्यांमार्फत राज्यात मीटर वाटपाच्या नोंदीबाबत तपासणी करण्यात येत असून त्याअंतर्गत दोषी असणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
महावितरणच्या मीटर वाटपात अनियमितता करण्यात येत असल्याच्या तक्रारींची दखल घेत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी मुख्यालयातील अधिकाऱ्यांना मीटर वाटपाच्या नोंदीबाबत काही परिमंडलांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्वरीत तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे कल्याण, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद व जळगाव येथील मीटर वाटपाच्या नोंदीची तपासणी केली. कंपनीतर्फे विकत घेतलेल्या प्रत्येक मीटरची नोंद ही महावितरणच्या ईआरपी प्रणालीमध्ये ठेवण्यात येते. तपासणी करण्यात आलेल्या कल्याण परिमंडलातील खालापूर उपविभाग व शाखा कार्यालयात कार्यरत उपकार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता यांनी महावितरणच्या ईआरपी प्रणालीत नोंद न घेता ग्राहकांना वीजमीटर दिले. ईआरपी प्रणालीत नोंद न घेतल्यामुळे ग्राहकांना वापरलेल्या विजेचे बीलच मिळू शकले नाही. हे त्यांनी जाणीवपूर्वक करून कंपनीचे आर्थिक नुकसान केले. तसेच कायस्वरुपी वीजपुरवठा खंडित थकबाकीदार ग्राहकांचे मीटर बदलून दिले. त्यामुळे अशा ग्राहकांचा वीजपुरवठा पैसे न भरता सुरळीत झाला व त्यामुळेही कंपनीचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे संबंधित अभियंते चौकशीत दोषी आढळल्याने या अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक परिमंडलातील चांदवड उपविभागांतर्गत दुगाव शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता यांनी ग्राहकांना वीजजोडणी दिली. मात्र त्याची नोंद महावितरणच्या ईआरपी प्रणालीत न केल्याने ग्राहकाचे वीजबिलींग सुरू झाले नाही. तसेच मीटरच्या नोंदी ईआरपी प्रणालीत न केल्यामुळे मीटर वापराविना पडून राहिले यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. अधिकाऱ्यावर नियंत्रण ठेवले नाही या कारणास्तव मुख्य अभियंत्यांचेही स्पष्टीकरण मुख्यालयाने मागविले आहे.
महावितरणने ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवा ऑनलाईन केल्या असून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या प्रत्येक मीटरची नोंद महावितरणच्या ईआरपी प्रणालीमध्ये असणे बंधनकारक आहे. श्री. संजीव कुमार यांनी याबाबत कठोर कारवाईचे आदेश मुख्यालयातील तपासणी अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार कल्याण व नाशिक परिमंडलांत ही कारवाई करण्यात आली. इतर परिमंडलातही दोषींवर अशाच पध्दतीची कारवाई करण्यात येणार आहे.