पुणे : महावितरण ग्राहक संपर्क अभियान अंतर्गत गेल्या तीन दिवसांत पुणे, पिंपरी शहरासह ग्रामीण भागातील 19 ठिकाणी झालेल्या आयोजनात 1097 पैकी 996 अर्ज व तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले तर उर्वरित 101 अर्जांचे ठराविक मुदतीत निरसन करण्यात येत आहे.
वीजग्राहकांसाठी नवीन वीजजोडणी, नावात बदल, पत्त्यात बदल, वीजभार आदींसाठी अर्ज मंजुरी तसेच वीजबिल दुरुस्ती, मीटर बदलण्यासह इतर तक्रारी सोडविण्यासाठी पुणे परिमंडलात महावितरण ग्राहक संपर्क अभियानास सुरवात झालेली आहे. गुरुवार (दि. 13) ते शनिवार (दि. 15) पर्यंत पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील प्राधिकरण, आकुर्डी, भोसरी, हडपसर 1, गणेशखिंड व कोथरूड उपविभाग कार्यालय तसेच औंध गाव, सुस रोड, ताथवडे शाखा कार्यालय या ठिकाणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण 643 विविध प्रकारचे अर्ज व तक्रारी प्राप्त झाल्या व त्यातील 629 अर्ज व तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले. उर्वरित 14 अर्ज व तक्रारींसाठी कार्यालयीन कार्यवाही आवश्यक असल्याने त्या ठराविक मुदतीत सोडविण्यात येत आहे. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनी अभियानाच्या विविध ठिकाणी भेटी देऊन वीजग्राहकांशी थेट संवाद साधला.
याशिवाय पुणे ग्रामीणमध्ये मुळशी विभागातील उरुळीकांचन, मुळशी, नसरापूर, हडपसर ग्रामीण उपविभागात, राजगुरुनगर विभागातील तळेगाव, लोणावळा, वडगाव मावळ, चाकण व राजगुरुनगर उपविभागात तर मंचर विभागातील नारायणगाव उपविभागात एकूण 454 तक्रारींपैकी 367 तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले तर उर्वरित 87 तक्रारींचे ठराविक कालावधीत निरसन करून त्यासंबंधी संबंधीत ग्राहकांना कळविण्यात येत आहे. या अभियानात तक्रारींचे जागेवरच निरसन करताना महावितरण मोबाईल अॅप तसेच महावितरण अंतर्गत ‘ऑनलाईन’ प्रणालीचाही वापर करण्यात आला. सोबतच अभियानात सहभागी नागरिकांना वीजसुरक्षा, महावितरणची ग्राहकसेवेबाबत माहिती देण्यात आली.
फोटो नेम/ओळ – Mahavitaran Abhiyan 15-07-2017 / महावितरण ग्राहक संपर्क अभियानामध्ये पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनी विविध ठिकाणी भेट देऊन वीजग्राहकांशी संवाद साधला.

