मुंबई, दि. 15 जून 2017 : महावितरणच्या संचालक (संचालन) पदावर श्री. अभिजीत देशपांडे यांची थेट भरती प्रक्रियेतून पुनश्च निवड झाली आहे. आज (गुरुवार, दि. 15 जून 2017) ला त्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. यापूर्वीही त्यांनी महावितरणच्या संचालक (संचालन) या पदाची जबाबदारी मागील तीन वर्षे यशस्वीरित्या सांभाळली आहे.
औरंगाबाद येथील मूळचे असलेले श्री. देशपांडे तत्कालीन विद्युत मंडळात कार्यकारी अभियंता म्हणून थेट सेवा भरतीत 1997 साली रूजू झाले. 2003 मध्ये त्यांची अधीक्षक अभियंता म्हणून पदोन्नती झाली. 2007 मध्ये बढतीने त्यांची वाणिज्य विभागाचे मुख्य अभियंता तर थेट भरतीने 2009 साली कार्यकारी संचालक (वाणिज्य) या पदावर निवड झाली. 2014 पासून ते महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयात संचालक (संचालन) म्हणून कार्यरत होते. याशिवाय उत्तर हरियाणा विद्युत वितरण कंपनीचे अर्धवेळ संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. या कंपनीच्या प्रगतीसाठी त्यांचा सल्ला मोलाचा ठरला आहे.
महावितरणच्या वरिष्ठ पातळीवरील व्यवस्थापनात तांत्रिक, वाणिज्य, वित्तीय, वीज विनियामक, मानव संसाधन इत्यादी विषयांच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत श्री. देशपांडे यांचा सक्रिय सहभाग असतो. विद्युत क्षेत्रातील विनियामक, वाणिज्यिक विषयांचे त्यांना तज्ञ मानले जाते.

