पुणे, दि. 05 : महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून श्री. एम. जी. शिंदे यांनी सोमवारी (ता. 05) कार्यभार स्वीकारला. याआधी ते कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.
पुणे जिल्ह्यातील मुळचे रहिवासी असलेले श्री. एम. जी. शिंदे यांनी विद्युत अभियांत्रिकीची पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहे. ते 1984 मध्ये तत्कालिन विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून सांगली येथे रुजू झाले. त्यानंतर सहाय्यक अभियंता म्हणून पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 1992 ते 1997 दरम्यान काम केले आहे. उपकार्यकारी अभियंता म्हणून 1997 ते 1999 दरम्यान मुंबई मुख्यालयात कार्यरत होते. तर पदोन्नतीनंतर श्री. शिंदे यांनी 2003 ते 2007 या कालावधीत पुण्यातील बंडगार्डन विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून काम पाहिले आहे. अधीक्षक अभियंतापदी निवड झाल्यानंतर 2010 ते 2013 मध्ये पुणे येथे तसेच कल्याण, सांगली व नाशिक येथेही ते कार्यरत होते. पदोन्नतीनंतर मार्च 2017 मध्ये श्री. एम. जी. शिंदे कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून रुजू झाले. त्यानंतर पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून ते आज रुजू झाले आहेत.
पुणे परिमंडलात लोकाभिमुख प्रशासनातून उत्कृष्ट व तत्पर पारदर्शक ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. सोबतच वीजबिलाच्या चालू रकमेसह थकबाकी वसुल करण्यासही प्राथमिकता देणार असल्याचे पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनी सांगितले.

