पुणे:
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी खासदार अॅड.वंदना चव्हाण यांची फेरनियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. शुक्रवारी पक्षाच्या वतीने महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते पक्ष कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन शहराध्यक्ष, खा.वंदना चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. पक्ष कार्यालय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी आणि पुष्पगुच्छांनी फुलून गेले होते.
सत्काराप्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, शिक्षण मंडळ अध्यक्ष वासंती काकडे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशोक राठी, अप्पा रेणूसे, लक्ष्मीताई दुधाणे, अश्विनी कदम, मोहिनी देवकर, विशाल तांबे, शिवालाल भोसले, प्रदीप गायकवाड, रुपाली चाकणकर, इकबाल शेख, मनाली भिलारे, राकेश कामठे, नितीन उर्फ बबलू जाधव, शालिनी जगताप, आनंद रिठे, नंदा लोणकर, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर प्रशांत जगताप म्हणाले, ‘अत्यंत सचोटीने, काळजीपूर्वक आणि निष्ठेने आजपर्यंत कार्य केल्यामुळेच खासदार वंदना चव्हाण यांची पुन्हा पक्षाच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मागील निवडणुकांमध्ये पक्षाच्या सचोटीच्या कामगिरीमुळे पक्षाने पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन केली. खासदार वंदना चव्हाण यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करत असाताना राजकीय आडाखे न ठेवता, मला समाजाला काहीतरी द्यायचे आहे या हेतूने काम केले. त्यांनी नगरसेवक, महापौर, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून केलेले कार्य, या आधीचे शहराध्यक्ष पदाचे कार्य, विधानसभेच्या आमदार, राज्यसभेच्या खासदार अशा प्रत्येक क्षेत्रात केलेले कार्य उत्तमरित्या केले आहे. पक्षाची राजकीय भूमिका सचोटीने मांडण्याचे देखील मोठे काम त्यांनी केले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिकेवर पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष खा. वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जोमाने काम करण्याची गरज आहे. चांगली राजकीय पक्ष बांधणी करण्याकरिता अहोरात्र काम केले पाहिजे. अधिक काम केल्यास पक्ष स्वबळावर सत्तेवर येण्यास मदत होणार आहे. 2017 मध्ये येणार्या आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्ण बहुमताची सत्ता आणण्याची कामगिरी पक्षाला करायची आहे.’
सत्काराला उत्तर देताना शहराध्यक्ष खा. वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘आदरणीय शरद पवार आणि अजित पवार यांनी दिलेली शहराध्यक्ष पदाची जबाबदारी अत्यंत जोमाने काम करून पार पाडायची आहे. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मागील निवडणुकीच्या दरम्यान काम केले तसेच आगामी निवडणुकांसाठी करायचे आहे. पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक वेगळा ठसा आपण उमटविला आहे, तो तसाच कायम ठेला पाहिजे. मला खात्री आहे की, पक्षाने केलेल्या चांगल्या कामामुळे 2017 च्या निवडणुकीत पुणेकर नक्कीच यश देतील. परंतु याकरीता पक्ष संघटन जास्त महत्वाचे आहे. एकत्रितपणे काम केल्यास यश नक्कीच मिळणार आहे. 24 तास पक्ष कसा वाढेल, शहर चांगले कसे ठेवता येईल त्यासाठी आपण काय केले पाहिजे, याचाच विचार मी करते आणि तो पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी करावा. सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आणण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून काम करावे. सर्व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे काम करत आहेत त्यांनी कामात सातत्य ठेवून अशाच प्रकारे जोमाने काम करावे. प्रत्येकानी आपल्या प्रभागात नवीन योजना राबवून शहर विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. महिला आणि युवती सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनातून पक्ष कार्य करेल.’
स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके म्हणाले, ‘मागील निवडणुकीमध्ये वंदना चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुकी लढण्यात आल्या. त्यावेळी जशी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी साथ दिली तशीच याही निवडणुकांमध्ये द्यावी आणि एकहाती सत्ता कशी येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. त्यांना शहराध्यक्ष पदाच्या कार्याकरिता शुभेच्छा’

