मुंबई : तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियाचा वापर वाढत असताना वाचकांची संख्यासुद्धा वाढत आहे. जास्तीत जास्त वाचकांना आकर्षित करण्यासाठी ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच, सोशल मीडियाचा वापर करुन अधिकाधिक लोकाभिमुख व्हावे. तरुणांना ग्रंथालयाकडे आकर्षित करण्याचे महत्त्वाचे कार्य ग्रंथालयांनी करावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे केले.
ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित केलेल्या सन 2013-14 साठीच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार’ तसेच ‘ डॉ. एस.आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार’ वितरण सोहळ्यात श्री. तावडे बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उप सचिव पा.म. ताकटे, ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार आदी उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले की, वाचनसंस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी शासन विविध स्तरांवर प्रयत्न करीत आहे. डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय हा त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सोशल मीडियाचा वापर वाढत असला, तरी वाचकांची संख्यासुद्धा वाढत आहे. तंत्रज्ञानाद्वारे अशा वाचकांशी संवाद वाढविण्याचे काम ग्रंथालयांनी करावे. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करावा, असेही श्री. तावडे यांनी सांगितले. ग्रंथालयांकरिता जिल्हा विकास निधी पुन्हा सुरु करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचेही श्री. तावडे यांनी सांगितले.
ग्रंथालय संचालनालयाच्या बोधचिन्हाचे अनावरण तसेच राष्ट्रीय ग्रंथसूचीचे प्रकाशन श्री.तावडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. पुरस्कारप्राप्त ग्रंथालयांच्या वतीने शिव शर्मा तर पुरस्कारप्राप्त कार्यकर्त्यांच्या वतीने रमेश सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथालय उपसंचालक सु. हि. राठोड यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी पुरस्कारप्राप्त ग्रंथालयांचे संचालक, ग्रंथमित्र, त्यांचे कुटुंबीय तसेच ग्रंथालय संचालनालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रंथालय संचालनायाच्या वतीने सन २०१३-१४ साठी खालीलप्रमाणे पुरस्कार वितरित करण्यात आले.
‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार’ शहरी विभागासाठी – (१) श्री.शारदा वाचनालय, गोंदिया (२) श्री.विठ्ठलनाथ संस्थान संचलित गीता ग्रंथालय, विरार, (३) कै.सौ.मंगला रघुनाथ केडगे वाचनालय, सांगली (४) डॉ.शामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, चंद्रपूर
ग्रामीण विभागासाठी – (१) शिवाजी सार्वजनिक वाचनालय, मांगले, जि.सांगली (२) विकास वाचनालय, लोणी,जि.पुणे (३) श्री.छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय, शिवपूर, लातूर (४) कै.लक्ष्मणराव शामराव मुंडे सार्वजनिक वाचनालय, टोकवाडी,जि.बीड.
‘डॉ.एस.आर.रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार’- (राज्यस्तर) कार्यकर्ता (राम हनमंतराव देशपांडे, अमरावती) सेवक (आत्माराम बाबुराव कांबळे, लातूर)
विभाग स्तरावरील कार्यकर्ता – (१) अमरावती – श्रीमती अरूणा सदाशिव कुल्ली, बुलढाणा (२) औरंगाबाद – देवीदास भगवानराव देशपांडे, औरंगाबाद (३)नागपूर-ॲड.डॉ.श्रावण किसनजी उके, गोंदिया (४) नाशिक- सतिश उत्तमराव पाटील, धुळे (५) पुणे- रमेश धोंडिबा सुतार, पुणे (६) मुंबई- नागेश मधुकर कुलकर्णी, अलिबाग (रायगड)
विभाग स्तरावरील सेवक- (१) अमरावती – प्रमोद आनंदराव वानखडे, अमरावती (२) औरंगाबाद – सूर्यकांत महालिंग शिरसे, लातूर (३) नागपूर – निरंजन दयाराम शिवणकर, भंडारा (४) नाशिक – राजेश वामन शिरसाट, नाशिक (५) पुणे – विठ्ठल डोमाजी क्षिरसागर, पुणे (६) मुंबई -भालचंद्र भाऊ वर्तक, अलिबाग (रायगड)