
पुणे : देशामध्ये अनेक भाषा आणि विचारांचे लोक राहतात. त्यामुळे समाजात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. युरोप, अमेरिका, चीनसारख्या देशांशी आपण तुलना केली, तर आपण आता कुठे आहोत हे समजू शकेल. भारत देश स्वतंत्र झाला असला, तरी भारतमाता अजूनही जातीव्यवस्थेच्या गुलामगिरीतच आहे. देशाचा सर्वांगिण विकास करायचा असेल, तर जातीव्यवस्थेच्या गुलामगिरीमध्ये अडकलेल्या भारतमातेला मुक्त करायला हवे, असे प्रतिपादन जनता दलाचे (यु) अध्यक्ष व राज्यसभेचे खासदार शरद यादव यांनी केले.
जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्च्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त प्रा.डॉ.सुधाकर जाधवर शैक्षणिक संकुल, मानाजीनगर, न-हे येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शरद यादव यांना ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ पद्मश्री डॉ.विजय भटकर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार भीमराव तापकीर, महापौर प्रशांत जगताप, विकासनाना दांगट पाटील, हर्षदा वांजळे, युगंधरा चाकणकर, काका चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर तसेच अॅड दिलीप जगताप आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांना सामाजिक व राजकीय पुरस्कार आणि पत्रकार विलास बडे यांना युवा पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, रोप, ग्रंथ असे पुरस्कारांचे स्वरुप होते. संस्थेच्या सामाजिक कार्याचा अहवाल असलेले उडान भाग २ या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी झाले.
शरद यादव म्हणाले, स्वातंत्र्योत्तर काळात प्रत्येक क्षेत्राचा टप्प्याटप्याने विकास होत गेला. त्यामुळे समाज जागृत झाला आहे. परंतु तरीही अनेक जुन्या समस्या आपल्यासमोर आहेत. शिक्षण क्षेत्रात अनेक जण ज्ञानदानाचे काम करतात, त्यातून युवकांना चांगला माणूस म्हणून घडविणे गरजेचे आहे. चांगला माणूस घडल्यास देशाचा विकास होईल. याकरीता शिक्षणाप्रमाणेच आजूबाजूचे वातावरण हे सगळ्यात मोठे विश्वविद्यालय मानून आपण पुढे जायला हवे.
आॅलिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंच्या यशाबद्दल ते म्हणाले, देशातील मुलींनी आॅलिम्पिकमध्ये आपला झेंडा फडकाविला आहे. परंतु अजूनही आपण कुठे आहोत, याचा अभ्यास करायला हवा. महाराष्ट्रापेक्षाही लहान असलेल्या देशांतील खेळाडू पुढे जात आहे. त्यामुळे आपण आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करुन त्यांचा गौरव केला पाहिजे.
डॉ.विजय भटकर म्हणाले, लोकशाही स्विकारणारा देश हे आपले वैशिष्टय आहे. आपला देश सुसंस्कृत पिढी निर्माण करु शकतो. उन्नत भारत तयार करायचा असेल, तर आयआयटीसारख्या संस्थांनी ग्रामीण भागाच्या सुधारणेसाठी तंत्रज्ञान निर्माण करायला हवे, असेही त्यांनी सांगितले. भीमराव तापकीर म्हणाले, ग्रामीण भागात तळागाळात जावून काम करणारा व्यक्ती म्हणजे गावाचा सरपंच असतो. महात्मा गांधी म्हणाले होते की खेडयाकडे चला. परंतु आता वाढत्या शहरीकरणामुळे खेडयातील लोक शहरात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने चांगले सरपंच घडायला हवेत.
पुरस्काराला उत्तर देताना पोपटराव पवार म्हणाले, सध्याची पिढी साक्षर होत आहे. परंतु सुसंस्कृत होत नाही. यामुळे भ्रष्टाचार आणखी वाढू शकेल. सध्या ७० टक्के खेडयांमध्ये पालक मुलांना ७वी पर्यंतचे शिक्षण देऊ शकतात. पुढील शिक्षणाची तेथे सोय नाही. त्यामुळे तेथे शिक्षणाच्या सोयी पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवे.
प्रास्ताविकात शार्दुल जाधवर म्हणाले, जाधवर परिवारात असलेल्या अठरा हजार विद्यार्थी व पालक आणि सातशेपेक्षा जास्त कर्मचा-यांना प्रेरणा मिळावी, याउद्देशाने सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते. तळागाळातील विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देत त्यांना समाजातील प्रेरणादायी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळावे, यादृष्टीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेचे प्रयत्न सुरु आहेत, असेही त्यांनी सांगितले.अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर यांनी आभार मानले.

