पुणे : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे ही भूमिका मांडल्याबद्दल पुणे बार असोसिएशनच्या वतीने आज खासदार संजय काकडे यांचे आभार मानले. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष पवार, सचिव अॅड. लक्ष्मण घुले, खजिनदार अॅड. प्रताप मोरे, अॅड. विजयसिंह ठोंबरे व अॅड. आनंद केकान यांनी खासदार संजय काकडे यांची भेट घेऊन यासंदर्भातील पत्र दिले.
खंडपीठ पुण्यातच व्हावे ही पुणेकरांची खूप वर्षांपासूनची मागणी आहे. पुण्यातून मुंबई उच्च न्यायालयात जाणाऱ्या दाव्यांची संख्या पाहता कोल्हापूरच्या तुलनेत ती जास्त आहे. पुण्यातून 60 टक्के दावे उच्च न्यायालयात जातात तर, कोल्हापूर परिसरातून जाणाऱ्या दाव्यांचे हे प्रमाण 40 टक्के आहे. राज्य सरकारकडे यासंदर्भात खासदार संजय काकडे यांनी पाठपुरावा करावा अशी विनंती खासदार संजय काकडे यांना यावेळी त्यांनी केली.
खासदार काकडे यांनी केंद्रिय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी पुण्यात आले असताना एका कार्यक्रमात पुण्यात खंडपीठ व्हावे म्हणून मागणी केली. तसेच, पुणेकरांची मागणी वास्तवाला धरुन असल्याचेही त्यांनी यावेळी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले होते. गडकरी यांनी यामध्ये लक्ष घालू असे आश्वासनही यावेळी दिले होते. खासदार काकडे यांनी जाहीरपणे ही भूमिका मांडल्याबद्दल पुणे बार असोसिएशनने त्यांचे आभार मानले व खंडपीठ पुण्यात व्हावे म्हणून खासदार काकडे यांनी पाठपुरावा करावा अशी त्यांना विनंतीही केली.