मुंबई- टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ”तारक मेहता का उल्टा चष्मा”विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. मालिकेतील एका भागामध्ये मुंबईची भाषा हिंदी असल्याचा उल्लेख करण्यात आला. याविरोधात मनसेने मालिकेच्या निर्मात्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे.

सब टीव्ही या चॅनेलवर मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या ”तारक मेहता का उल्टा चष्मा” मालिकेची लोकप्रियता अफाट आहे. लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत, सर्वजण मालिका पाहतात. या मालिकेत वेगवेगळ्या राज्यातील कुटुंब सोबत राहतात आणि आपले सुख-दुख वाटून घेतात, अशी थीम यात दाखवण्यात येते. पण, काही दिवसांपूर्वी एका भागातील दृष्यादरम्यान मुंबईची भाषा हिंदी असल्याचा उल्लेख यात करण्यात आला. त्याविरोधात मनसे आक्रमक झाली आहे.
मनसे चित्रपट सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवरुन मालिकेला आणि चॅनेलला चांगलाच दम दिला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहीले की, “मुंबईची ‘आम भाषा’ हिंदी नाही, मराठी आहे, हे ह्या सब टीव्हीवाल्यांना मान्य नसेल, तर महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या कानाखाली ‘सुविचार’ लिहावे लागतील! तेसुद्धा मराठीत! कानाखाली काढलेले मराठी सुविचार’ ह्यांना बरोबर वाचता येतील!”
त्यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपर यांनीदेखील ट्विटरवरुन मालिकेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी लिहीले की, हेच ते मराठीचे मारक मेहता आहेत. मनसेचा विरोध याच नीच वृत्तीला आहे. मुंबईची भाषा मराठी, हे यांना नीट माहिती आहे, तरीही मालिकेमधून असा प्रकारचा अप्रचार सुरू असतो. यांची मस्ती उतरवावीच लागेल. या गुजराथी किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही यात काही चूक वाटत नाही, याचीच शरम वाटते.”


