मुंबई-ज्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यामुळे त्यांना पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार मिळाला आहे ते मतदार मोदी युगातील बालके आहेत आणि हाच त्यांचा खरा आशीर्वाद आणि लाभ आहे असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ या खात्यांचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे. ते आज उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील हसनपूर विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार मिळालेल्या मतदारांच्या मेळाव्यात बोलत होते. या तरुण नवमतदारांना मतदान करण्याचा त्यांचा अधिकार वापरण्याची संधी मिळत आहे आणि ते एका अशा भारतातील मोदी सरकारसाठी मतदान करतील जो भारत विश्वासाने भरलेला आहे आणि त्याचा प्रवास वरच्या दिशेने होत आहे, असे ते म्हणाले. ही परिस्थिती स्वातंत्र्यानंतरच्या युवा वर्गाच्या दोन पिढ्यांना ज्या निराशावादी आणि सन्मानाचा अभाव असलेल्या वातावरणाचा सामना करावा लागला त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे, असे त्यांनी सांगितले. त्या काळात अनेक युवकांना देशात राहून कोणतेही आशादायी भविष्य दिसत नसल्याने ते परदेशात गेले, असे जितेंद्र सिंह म्हणाले.
जे मतदार पहिल्यांदाच मतदान करतील ते आजपासून 25 वर्षांनी देशाच्या स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी होत असताना वयाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यात असल्यामुळे ते अतिशय महत्त्वाचे मतदार आणि भारतीय समाजातील मत निर्माते बनतील, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भविष्यवेधी दृष्टी आहे आणि याच कारणामुळे भारतामध्ये उदयाला येत असलेल्या नव्या पिढीवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

