भोजपुरी सीनेसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा अभिनेत्री आकांक्षा दुबेने रविवारी वाराणसीतील एका हॉटेलात आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री शूटिंग संपवून आकांक्षा हॉटेलमध्ये गेली. तिथे गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही बाब रविवारी उजेडात आली. तिने हे पाऊल का उचलले हे समजू शकले नाही.
रविवारी सकाळी मेकअप मॅनने आकांक्षाला फोन केला. तिने प्रतिसाद न दिल्याने तो थेट हॉटेलवर गेला. तिथे आकांक्षा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आकांक्षाने सकाळपासून नाश्त्याचा ऑर्डर दिला नाही. त्यामुळे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. तेव्हाही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, त्यांनी पोलिसांना पाचारण केले.
मॅनेजरने पोलिसांच्या हजेरीत मास्टर चावीने दरवाजा उघडला असता आकांक्षाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला. ACP सारनाथ यांनी तिच्या मोबाईलसह अन्य सामान जप्त करून पुढील तपास सुरू केला. तिच्या मोबाईल नंबरवरून करण्यात आलेल्या कॉल्सची डिटेल्सची मागवली जात आहे.
आकांक्षाने ‘वीरों के वीर’ व ‘कसम पैदा करने वाले की 2′ नामक चित्रपटांत काम केले होते. आज 26 मार्च रोजीच तिचे भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहसोबतचे एक नवे गाणे रिलीज झाले आहे. आरा कभी हारा नहीं’ असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणे न पाहताच आकांक्षाने आत्महत्या केली.
आकांक्षा दुबे वयाच्या तिसऱ्या वर्षी पालकांसोबत मुंबईत शिफ्ट झाली होती. तिच्या पालकांची तिला आयपीएस अधिकारी बनवण्याची इच्छा होती. पण तिला डान्स व अभिनयात रस होता. लहानपणापासूनच तिला टीव्ही पाहणे पसंत होते. यामुळे तिचे पाऊल सीनेजगताकडे वळले. मुंबईत शिक्षण घेतल्यानंतर आकांक्षाने चित्रपटांत आपले करिअर सुरू केले. यासाठी तिला तिची मैत्रीण पुष्पांजली पांडेने मदत केली. असे सांगण्यात येते कि,आकांक्षा दुबेने वयाच्या 17 व्या वर्षी भोजपुरी सिनेमात पाऊल ठेवले. तिथे तिने डायरेक्टर आशी तिवारीसोबत काही चित्रपटांत काम केले. तिला अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागला. यामुळे 2018 मध्ये ती नैराश्यात गेली होती. त्यानंतर तिने फिल्मी पडद्यापासून अंतर राखले. नव्या अभिनेत्यांना सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोपही तिने केला होता. यामुळे मोठी खळबळ माजली होती.
आकांक्षा आत्महत्येपूर्वी इंस्टाग्राम लाईव्हमध्ये रडताना दिसली. सध्या व्हिडिओ डिलीट करण्यात आला आहे. याशिवाय रात्री उशिरा तिने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्यात ती ‘हिलोर मारे’ या भोजपुरी गाण्यावर आरशासमोर बेली डान्स करताना दिसून येत आहे. या अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या नात्याची घोषणा केली होती. तिने आपला को-स्टार समर सिंहसोबतचा फोटो पोस्ट करत हॅपी व्हॅलेंटाईन्स डे असे लिहिले होते.