नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मेक इन इंडिया व मेड इन इंडियाची सुरुवात झाली आहे. त्यातूनच संरक्षण दलातील विविध साधन सामग्री व संरक्षण साहित्य हे आपल्याच देशात तयार होत असून संरक्षण सामग्री निर्यात करणारा देश म्हणून भारताची ओळख होत आहे, ही आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
गोल्फ क्लब मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या नो युवर आर्मी या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार हेमंत गोडसे, ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, बंदरे विकास व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, स्कुल ऑफ आर्टीलरी चे कमांडन्ट लेफ्टनंट जनरल एस. हरिमोहन अय्यर, तोफखाना केंद्राचे ब्रिगेडियर ए. रागेश, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह अर्टीलरी केंद्राचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, नव तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्याच देशात निर्मिती करण्यात येणारे संरक्षण दलातील साधन सामग्री, सैन्यात दिले जाणारे प्रशिक्षण या माध्यमातूनच देशाचे संरक्षण कसे केले जाते. यासर्व गोष्टींची माहिती सर्व सामन्यांना, नव युवकांना होण्यासाठी या नो युवर आर्मी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात बोफोर्स तोफ सोबतच भारताने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवलेली धनुष्य ही तोफ देखील ठेवण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व तरुणांना
सैन्यात भरती होण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळणार असल्याचे श्री. गडकरी यांनी यावेळी सांगितले.
ज्ञान ही एक शक्ती आहे. या ज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड देऊन संरक्षण दलात नवनवीन संशोधन करण्यात येत आहे. यामुळे संरक्षण क्षेत्रात तयार करण्यात येणाऱ्या साधन सामग्रीच्या निर्यातीतून देशात नवीन रोजगार निर्मितीला चालना मिळत आहे. नाशिकमधील एचएएल येथे निर्माण होणारे संरक्षण साहित्य, देवळाली कॅम्प व नाशिक येथे संरक्षण क्षेत्रातील मोठी व्यवस्था आहे, या पार्श्वभूमीवर येथे रोजगार निर्मितीसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. यातून आपण संरक्षण क्षेत्रात सक्षम आणि सामर्थ्यवान झाल्याने देशाचे सर्वच बाबतीत रक्षण करणे शक्य आहे. आपल्या देशाच्या संरक्षणाची ताकद वाढविण्यात स्थलसेना, वायुसेना व नौसेना या तिन्ही दलांचा मोठा वाटा आहे, असेही श्री गडकरी यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हवेत फुगे सोडून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. तसेच आर्टीलरीमार्फत घोडे स्वरांच्या मध्यामातून विशेष प्रत्याशिके दाखवून उपस्थितांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्कुल ऑफ आर्टीलरीचे कमांडन्ट लेफ्टनंट जनरल एस हरिमोहन अय्यर यांनी केले. तर खासदार हेमंत गोडसे यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.