पुणे, दि. ७ जुलै २०२६ : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे महानगरपालिका पूर्ण क्षमतेने सज्ज झाली असून ‘पुणे प्रथम – सेवावारी २०२६’ या उपक्रमांतर्गत वारकरी भाविकांसाठी सर्वंकष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पालखी मार्ग, मुक्कामस्थळे आणि प्रमुख ठिकाणी स्वच्छता, पिण्याचे पाणी, तात्पुरती स्वच्छतागृहे, वैद्यकीय सेवा, प्रकाश व्यवस्था, अग्निसुरक्षा, आपत्कालीन प्रतिसाद पथके तसेच नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून महापौर मंजुषा नागपुरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत या व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली.

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘पुणे प्रथम – सेवावारी २०२६’ या उपक्रमामध्ये पारंपरिक सेवाभावाला आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी प्रशासनाची जोड देण्यात आली आहे. दोन्ही पालखी सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन पूर्ण केले असून वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी व्यापक व्यवस्था उभारण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा नागपुरे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका उपायुक्त माधव जगताप तसेच संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसमवेत पालखी विठोबा चौक, निवडुंगा विठोबा देवस्थान, ज्योतिबा फुले गर्ल्स हायस्कूल (नाना पेठ) तसेच शांताबाई लडकत प्राथमिक विद्यालय येथे उभारण्यात आलेल्या पालखी मुक्कामस्थळांची पाहणी केली. यावेळी जर्मन मांडव, वारकऱ्यांच्या निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीजपुरवठा, तात्पुरती स्वच्छतागृहे आणि इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

प्रत्येक विभागाला स्वतंत्र जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या असून पालखी मुक्कामाची सर्व व्यवस्था सुरळीत पार पडावी, प्रत्येक ठिकाणी आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध राहाव्यात आणि वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क ठेवण्यात आले आहे.
सध्या शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवरही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर आवश्यक उपाययोजना, आपत्ती व्यवस्थापन पथके, आरोग्य विभाग, अग्निशमन दल आणि क्षेत्रीय कार्यालयांतील अधिकारी २४ तास सज्ज ठेवण्यात आले आहेत. पालखी मार्गावर स्वच्छता, सुरक्षितता आणि तातडीची मदत उपलब्ध राहावी यासाठी स्वतंत्र नियंत्रण व्यवस्था उभारण्यात आली आहे.

पालखी सोहळ्यादरम्यान वाहतूक व्यवस्थेतील बदल लक्षात घेऊन नागरिकांनी प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घ्यावी तसेच पालखी सोहळा सुरक्षित, स्वच्छ आणि भक्तिमय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासन व पोलिस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहनही महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.

