महायुतीचा पोपट मेला:संभाजीनगरसह पुण्यातही भाजप नेत्यांच्या अंहकार आणि हट्ट यामुळेच युती टिकू शकली नाही- शिवसेना

Date:

पुणे- निवडून येणाऱ्या जागा द्यायच्याच नाही , अत्यंत कमी जागा द्यायच्या ,आपलाच वरचष्मा ठेवायचा , जातीभेद करायचा अशा विविध स्वभावाच्या पैलूंच्या काही भाजपा नेत्यांचा अहंकार आणि हट्ट यामुळे संभाजी नगर पाठोपाठ पुण्यातही महायुतीचा पोपट मेल्याचे दिसले आहे. पुण्यात प्रथमपासून भाजपच्या नेत्यांनी माजी खासदार संजय काकडे , माजी आमदार रवी धंगेकर यांना टाळले त्यांच्या समर्थकांना पूर्णतः डावलले ,एकनाथ शिंदेंचे कट्टर समर्थक असलेले नाना भानगिरे यांचीही पर्वा केली नाही.एवढेच नव्हे तर बरोबरच्या सहकारी रिपब्लिकन पक्षाच्या लोकांना उमेदवारी न देता रिपब्लिकन च्या नावाकाहाली स्वतःच्याच कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली, ज्यांनी उभी हयात राजकारणात घालविली अशा ज्येष्ठांचा अवमान केला अशी करणे पुण्यातील युती तुत्न्यामागे दिली जात आहेत . पुण्यातील महायुती अजितदादा स्वतंत्र लढणार अशी घोषणा होताच युतीवर येऊन दाखल झाली होती आता युतीचाही पोपट मेला आहे. जिथे शिवसेनेने उमेदवारी दिली तिथेच भाजपा नेत्यांनी AB फोरम जमा करत उमेदवारांना अर्ज दाखल करायला लावल्याने हि परिस्थिती ओढविली आहे. परिणामी अनेक माजी नगरसेवकांनी आज परस्पर अजितदादा किंवा शिवसेना असा पर्याय तातडीने निवडायला सुरुवात केली .

भाजप आणि शिवसेनेतील जागावाटपाचा हा पेच सोडवण्यासाठी राज्याचे मंत्री उदय सामंत आज पुण्यात येणार होते. मात्र, ते पोहोचण्यापूर्वीच पुण्यातील शहराध्यक्ष आणि उपनेत्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करत आक्रमक पवित्रा घेतला. हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बैठकीतून शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि इतर पदाधिकारी थेट ‘एबी फॉर्म’ वाटपासाठी बाहेर पडले. “आम्ही आता कोणाचीही वाट पाहणार नाही, 165 जागांवर आमचे उमेदवार उभे करू,” असे शिंदे गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी सांगितले.

आम्ही सर्व जागा लढणार – भानगिरे

“आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत. आम्ही जेवढ्या सर्व जागा आहेत, तेवढ्या सर्व जागा लढणार आहोत. थोड्याच वेळात सर्व जागा लढवण्याचा निर्णय होईल. वेगळे लढवण्याचे ठरलेले आहे आणि आमच्या सर्व उमेदवारांना एबी फॉर्म मिळतील. ज्या ठिकाणी आमच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत, त्या सर्वांना एबी फॉर्म दिले जातील”, असे नाना भानगिरे यांनी म्हटलं आहे.

भाजपने दुय्यम स्थान दिल्याची कार्यकर्त्यांची भावना

निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपने पुण्यात ‘मोठ्या भावा’ची भूमिका बजावताना शिवसेनेला दुय्यम स्थान दिल्याची भावना शिवसैनिकांमध्ये होती. 15 जागांवर ठाम राहून भाजपने वाटाघाटीचे दरवाजे बंद केल्याचे दिसताच, शिवसेनेने स्वतंत्र अस्तित्वासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आता पुण्यात भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) असा ‘फ्रेंडली फाईट’ किंवा थेट संघर्ष पाहायला मिळणार आहे.


एकूणच महापालिका निवणुकीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून,संभाजी नगरात महायुती तुटल्याची अधिकृत घोषणा शिवसेना शिंदे गटाचे नेते तसेच मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. भाजपचा हट्ट आणि अंहकार यामुळेच ही युती टिकू शकली नाही, असा थेट आणि तीव्र आरोप शिरसाट यांनी केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये भाजपकडून सातत्याने दबावाचे राजकारण केले जात होते. जागावाटपात शिवसेनेला डावलण्याचा प्रयत्न झाला, तसेच स्थानिक नेत्यांचा सन्मान न राखता एकतर्फी निर्णय लादले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

शिरसाट म्हणाले की, महायुती ही समानतेच्या तत्वावर उभी असते, मात्र संभाजीनगरमध्ये भाजपने भागीदार पक्षाला गृहित धरले. अनेक बैठका, चर्चा आणि समन्वयाचे प्रयत्न करूनही भाजपकडून कोणतीही लवचिकता दाखवण्यात आली नाही. अखेर स्वाभिमान आणि कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जपण्यासाठी युती तोडण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला, असे त्यांनी स्पष्ट केले.

या घोषणेमुळे संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आगामी महापालिका निवडणुकीत आता थेट आणि तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होत आहे. महायुतीतील या महास्फोटामुळे भाजपसह सर्वच पक्षांच्या रणनीतींवर मोठा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. सत्ताधारी महायुतीमधील एक महत्त्वाचा घटक असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडण्याचा निर्णय घेतल्याची अधिकृत घोषणा मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजपच्या भूमिकेमुळे आणि सातत्याने दाखवण्यात आलेल्या अहंकारी वृत्तीमुळेच हा निर्णय घ्यावा लागला, असा थेट आणि तीव्र आरोप त्यांनी केला. या घोषणेमुळे संभाजीनगरमधील शिंदेसेना-भाजप युतीला मोठा धक्का बसला असून, आगामी महापालिका निवडणुकीचे राजकीय गणित पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले की, संभाजीनगरमध्ये युती व्हावी, यासाठी राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाकडूनही गंभीर प्रयत्न करण्यात आले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून युतीसाठी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पातळीवर अनेक वेळा बैठका घेण्यात आल्या, चर्चा झाल्या आणि समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुरुवातीपासूनच भाजपच्या स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांची भूमिका वेगळी असल्याचे जाणवत होते. युतीबाबत बोलण्यात काही आणि प्रत्यक्ष कृतीत काही, अशी परिस्थिती निर्माण होत होती, ज्यामुळे शंका बळावत गेल्या, असे शिरसाट यांनी सांगितले.

युती वाचवण्यासाठी आपण स्वतः सातत्याने प्रयत्न केल्याचेही संजय शिरसाट यांनी नमूद केले. स्थानिक नेत्यांशी फोनवरून चर्चा करण्यात आल्या. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतही सविस्तर बैठक झाली, असे त्यांनी स्पष्ट केले. या चर्चांमधून काही सकारात्मक संकेत मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, बैठका आणि चर्चांनंतरही भाजपच्या भूमिकेत फारसा बदल झाला नाही. वरवर युतीबाबत सकारात्मक बोलले जात असले, तरी प्रत्यक्षात शिवसेनेला कमी लेखणारी भूमिका कायम राहिली, असा आरोप शिरसाट यांनी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय शिरसाट यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, युतीबाबतचा अंतिम टप्पा आला असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जागावाटपावर सहमती झाली होती. त्या चर्चेनंतर युती निश्चित झाली, अशा समजुतीत शिवसेना होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही सकारात्मक संदेश गेला होता. मात्र, प्रत्यक्षात जागावाटपाची अंमलबजावणी करण्याची वेळ आली, तेव्हा चित्र वेगळेच समोर आले. भाजपकडून शिवसेनेच्या जागाच सोडाव्यात, असा प्रस्ताव पुढे करण्यात आला, असे शिरसाट यांनी सांगितले.

भाजपने मांडलेला प्रस्ताव शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत अपमानास्पद असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या ताकदीच्या जागा सोडण्याची मागणी करण्यात आली, जी कोणत्याही परिस्थितीत मान्य होऊ शकत नव्हती. आमच्या कार्यकर्त्यांचा स्वाभिमान आणि पक्षाची भूमिका लक्षात घेता असा निर्णय घेणे शक्य नव्हते, असे त्यांनी ठामपणे सांगितले. एकीकडे युतीबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे शिवसेनेला कमकुवत करणारे प्रस्ताव मांडायचे, ही भाजपची दुहेरी भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला.

संजय शिरसाट यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शेवटच्या क्षणापर्यंत भाजपकडून कोणताही नवा किंवा सन्मानजनक प्रस्ताव देण्यात आलेला नाही. उलट भाजपने आपली आग्रही भूमिका कायम ठेवली. आमची ताकद वाढली आहे, आम्ही काहीही करू शकतो, असा अहंकार भाजपच्या भूमिकेतून दिसून येत होता. हा अहंकारच आज युती तुटण्याचे मुख्य कारण ठरला, असे शिरसाट यांनी ठामपणे सांगितले. युती समानतेच्या तत्वावर चालते, मात्र येथे ते तत्व पायदळी तुडवले गेल्याचा आरोपही त्यांनी केला.

महायुती तुटल्याची ही घोषणा संभाजीनगरच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी ठरली आहे. शिंदेसेना-भाजप युतीतील हा स्फोट महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झाल्याने सर्वच पक्षांच्या रणनीतींवर त्याचा परिणाम होणार आहे. आता निवडणुकीत थेट आणि तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजय शिरसाट यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय चर्चांना वेग आला असून, येत्या काळात संभाजीनगरच्या निवडणूक रणांगणात आणखी मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम व्हावे – योगेश सोमण

मसाप निवडणूक'साहित्य संवर्धन आघाडी’ जाहीरनामा प्रसिद्ध पिंपरी, पुणे (दि. १३...

अभय योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ, गणेश बिडकरांच्या मागणीला तत्काळ यश

पुणे (दि. १३) : महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत...

महापालिकेच्या विविध समित्यांवर सदस्यांची झाली निवड

पुणे - महापालिकेच्या मुख्य सभेत आज स्थायी समिती सदस्यांच्या...