पुणे-‘आंदेकर टोळी’चा म्होरक्या आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकर याने आज पोलिसांच्या कडक बंदोबस्तात, हातात बेड्या आणि गळ्यात दोरखंड असलेल्या स्थितीत महापालिका निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोलिसांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात आणले होते . विशेष न्यायालयाने दिलेल्या सशर्त परवानगीनंतर आंदेकर कुटुंबातील तिघांनी तुरुंगातून बाहेर येत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे.
आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या येरवडा कारागृहात असलेला बंडू आंदेकर आज दुपारी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात दाखल झाला. पोलिसांनी त्याला दोरखंडाने जखडलेले होते आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्याच्या चेहऱ्याला काळे कापड बांधले होते. मात्र, अर्ज भरण्यासाठी कार्यालयात जाताच आंदेकरने ‘व्हिक्ट्री साईन’ दाखवत घोषणाबाजी सुरू केली. “नेकी का काम, आंदेकर का नाम,” अशा घोषणा देत त्याने परिसर दणाणून सोडला. “बघा, मला लोकशाहीत कसं आणलंय. मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही. आंदेकरांना मत म्हणजे विकासाला मत,” असे ओरडून तो उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.
केवळ बंडू आंदेकरच नव्हे, तर त्याच्या कुटुंबातील आणखी दोन महिलांनीही तुरुंगातूनच अर्ज भरले आहेत. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर हेदेखील 5 कोटी 40 लाखांच्या खंडणी प्रकरणात जेलमध्ये आहेत. या दोघींनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. बंडू आंदेकर हा प्रभाग क्रमांक 24 मधून अपक्ष किंवा राष्ट्रवादीकडून लढण्याची शक्यता आहे.
विशेष न्यायालयाने या तिघांनाही आगामी महापालिका निवडणुकीत उमदेवारी अर्ज भरण्यास परवानगी दिली.दरम्यान, आंदेकर कुटुंबातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांचा आयुष कोमकर हत्याकांडाशी थेट संबंध नसल्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी म्हटले. त्यामुळे या दोघींनाही राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. मात्र, आरोपी बंडू आंदेकरला ‘घड्याळ’ मिळणार की त्याला अपक्ष लढावे लागणार, यावर अद्याप सस्पेन्स कायम आहे. आंदेकर कुटुंब पुण्याच्या प्रभाग क्रमांक 22, 23 आणि 24 मधून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.

