पवारांच्या विचारांची वाटचाल पुढे सुरु ठेवण्यासाठीच राजीनामा
राजीनामा पत्रात म्हटलेय ..पवारसाहेबांचा पुरोगामी विचार व सामान्य कार्यकर्ता केंद्रस्थानी ठेवून आजपर्यंत पक्षाप्रमाणेच माझीही सामाजिक – राजकीय वाटचाल आजवर राहिली .हीच वाटचाल यापुढेही तशीच ठेवण्यासाठी मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.
मनपा निवडणूक लढवण्याची घोषणा- अजित पवार गटाशी युतीला विरोध केल्याने पडले स्वपक्षात अध्यक्षच एकाकी
पुणे-अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी महापालिका निवडणुकीत युती करण्यास विरोध करून शरद पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांचा रोष पत्करलेले आणि यावरून स्वपक्षात एकटे पडलेले माजी महापौर प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. पुणे येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये कोणती भूमिका घ्यावी, याबाबत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या घालमेलीमुळे सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून हा निर्णय घेतल्याचे जगताप यांनी सांगितले. या राजीनाम्याचे कोणतेही दूरगामी परिणाम नसून, त्यांना कोणताही राजकीय लाभ अपेक्षित नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाचे कार्यालय त्यांच्या नावावर असले तरी त्यावर आता त्यांचा कोणताही अधिकार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.प्रशांत जगताप यांनी आपण राजकारण आणि समाजकारण सोडणार नसल्याचे जाहीर केले. आगामी महानगरपालिका निवडणूक लढवणार असून, कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी आपण निवडणूक लढवत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाला अंधारात न ठेवता आपण बाहेर पडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रशांत जगताप म्हणाले, 27 वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालो. आज 27 वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच असेल असे जगताप म्हणाले. आजपर्यंत अत्यंत निष्ठेने मला साथ देणाऱ्या, यापुढेही संघर्षाच्या वाटेवर माझ्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार जगताप यांनी मानले. यावेळी त्यांनी केवळ शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या आठवणी सोबत घेऊन जात असल्याचे भावनिक उद्गार काढले.१० जून १९९९ रोजी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात करोडो लोक सहभागी झाले होते, त्यापैकी आपण एक असल्याचे जगताप यांनी सांगितले. २६ वर्षे, सहा महिने आणि ११ दिवस त्यांना पक्षात काम करता आले. या काळात त्यांना अनेक पदे मिळाली आणि पक्षाने त्यांना संधी दिली.
वानवडी भागात आणि पुण्यातील नागरिकांनी त्यांना नेहमी साथ दिली. कोणत्याही पक्षावर आपला वैयक्तिक राग नसून, विविध आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. हडपसर विधानसभा मतदारसंघात पराभूत होऊनही त्यांना एक लाख २७ हजार मते मिळाली होती, ज्याचे श्रेय त्यांनी कार्यकर्त्यांच्या कष्टाला दिले.राजीनाम्यानंतर आपल्या मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा करून निवडणूक कशी लढवायची, याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाने कोणतीही विशिष्ट गोष्ट केली म्हणून आपण हा राजीनामा देत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.एका पराभवामुळे भीती बाळगणारा मी नाही. विधानसभेत मी हरलो पण मला तिथल्या सगळ्या लोकांच्या प्रती मला आदर आणि मान असल्याचे जगताप यावेळी म्हणाले. पार्टी कशी निवडणूक लढवेल याची मी तयारी केली होती. माझ्यासारखा कार्यकर्ता व्यथित झाला होता. माझ्या मनात विचारांची घालमेल होती. पण घालमेल माझ्या आयुष्यावर उलटल्याचे प्रशांत जगताप म्हणाले. सद्विवेक बुद्धीला जागरूक ठेवून आणि सगळे प्रसंग डोळ्यासमोर ठेऊन आणि सगळ्या नेत्यांचा मान ठेऊन मी शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडत आहे. मी राजकारणातून बाहेर गेलो नाही असेही त्यांनी सांगितले. मी राजीनामा शशिकांत शिंदे यांना मेल केला आहे. नगरसेवक पदाची निवडणूक मी लढवणार असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर दिला राजीनामा
राज्यात 29 महापालिका निवडणुकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. मात्र त्याआधीच पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी 22 डिसेंबर रोजी त्यांच्या पदाचा तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सुपूर्द केल्याची चर्चा होती. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या संभाव्य युतीला प्रशांत जगताप यांनी दर्शवलेला तीव्र विरोध त्यांच्या राजीनाम्यास कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. तसेच दोन दिवसात आपण राजीनाम्याचा निर्णय घेणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. यानंतर मंगळवारी आणि आज असे दोन दिवस प्रशांत जगताप यांनी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर अखेर आज शहराध्यक्ष आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे आभार
सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करण्याची मला संधी मिळाली. पक्षात खूप चांगल्या पद्धतीने मी कामकाज केले. हडपसर वानवडी परिसरातील नागरिकांनी मला दादा दिली. मी रस्त्यावर उतरून काम केले. हे मी पुणेकर यांच्यासाठी केले. त्यामुळे मी सर्वप्रथम शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे आभार मानतो. मी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातून आलो आहे. मात्र आज मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शहराध्यक्ष पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मी शशिकांत शिंदे यांना राजीनामा पाठवला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रशांत जगताप यांनी ट्विट करत व्यक्त केल्या भावना
प्रशांत जगताप यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा आणि त्याचवेळी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामाही देण्याचा माझा निर्णय अतिशय शांत चित्त आणि स्पष्ट सद्सद्विवेकबुद्धीचा कौल यांचा परिपाक आहे. कुठलंही पद अथवा निवडणूक अशी तात्कालिक कारणे नव्हेत; तर तत्त्वांचं मनात चाललेलं द्वंद्व मला या निर्णयापर्यंत घेऊन आलं. राजकीय सत्ता ही तेव्हाच अर्थपूर्ण असते, जेव्हा ती सर्वसामान्य माणसाच्या स्वातंत्र्याचं आणि प्रतिष्ठेचं रक्षण करते, असं मला वाटतं.
आजतागायत मी याच विचारांनी माझं समाजकारण – राजकारण करत आलो आहे. जात-धर्म-भाषा यांच्यापलीकडे जाऊन सर्व भारतीयांच्या कल्याणाचा विचार, हाच खऱ्याखुऱ्या राष्ट्रवादाचा पाया आहे. आपल्या संविधानाने पाहिलेलं विविधरंगी, पण एकात्म भारताचं स्वप्न शतखंडीत करू पाहणारे लोक दुर्दैवाने आज सत्तेवर आहेत. त्यामुळे सत्तेसाठी जुळवल्या जाणाऱ्या इतर कुठल्याही समीकरणांपेक्षा संविधानाने मांडलेलं हे साधं अंकगणित मस्तकात बाळगून फिरणाऱ्या संविधाननिष्ठ कार्यकर्त्यांपैकी मी एक आहे. आज भूमितीय वेगाने वाढत चाललेल्या बहुसंख्याकवाद, धार्मिक उन्माद आणि द्वेषाच्या राजकारणाला माझ्या गणितात अजिबात जागा नाही. त्यामुळे माझी बांधिलकी ही इथल्या सर्वसामान्य जनतेशी होती, आहे आणि राहील. त्याला कुठल्याही पक्षीय चौकटीची गरज नाही. कारण, सार्वजनिक सत्तापदे ही लोकशाही संस्था, नागरी स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य यांच्या संरक्षणासाठी वापरायची असतात, या तत्त्वावर माझी नितांत श्रद्धा आहे.
जेव्हा घटनात्मक, सर्वसमावेशक राजकारण आणि द्वेषप्रेरित राजकारण यांच्यातील सीमारेषा धूसर होऊ लागतात, तेव्हा अशा परिस्थितीत तात्त्विक तडजोडी करत बसण्याऐवजी अंतर्मुख होऊन विचार करणे आणि सोपविलेल्या जबाबदारीपासून दूर जाणे, हेच श्रेयस्कर असते. त्यामुळे माझा राजीनामा ही व्यक्ती अथवा संघटनेबद्दलची निषेधात्मक कृती आहे, असे समजण्याचे कारण नाही. समतावादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी विचारांवर ठाम राहण्यासाठी मनाने दिला तो निःसंदिग्ध कौल आहे. माझ्यावर विविध जबाबदाऱ्या सोपवून विश्वास दाखवणाऱे माझे नेते, सहकारी आणि पक्ष कार्यकर्ते यांचा मी सदैव ऋणी आहे. हा निर्णय मी अजिबात कटू मनाने घेतलेला नाही. पण, या निमित्ताने जनसेवेचा, संविधान रक्षणाचा आणि लोकशाही संवर्धनाचा माझा संकल्प अधिकच बळकट झाल्याचेही मी नम्रपणे नमूद करतो. कुठलीही राजकीय तडजोड त्याच्या आड कधीही येणार नाही, याचीही ग्वाही मी या निमित्ताने आपणास देतो. देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी स्वातंत्र्य, समता आणि न्यायाचा हा लढा मी माझ्या परीने चालूच ठेवेन. भारतीय संविधान चिरायू राहो! असे ट्विट प्रशांत जगताप यांनी केले आहे.

