‘आयसीएआय’तर्फे ‘जीएसटी’वरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
पुणे : “वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) संकलनात महाराष्ट्राचा वाटा जवळपास २० टक्के आहे. दरवर्षी दोन लाख १७ हजार कोटी इतका जीएसटी महाराष्ट्रातून भरला जातो. त्यामुळे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी सनदी लेखापालांचे योगदान मोलाचे असून, जास्तीस्त जास्त जीएसटी संकलित करण्यासाठी पुढाकार घेऊन सनदी लेखापाल भारतीय अर्थव्यवस्थेला सक्षम करण्याची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडत आहेत,” असे प्रतिपादन राज्याचे वने, मत्स्योत्पादन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) जीएसटी अँड इनडायरेक्ट टॅक्सेस कमिटी आणि ‘आयसीएआय पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वस्तू व सेवा कर (जीएसटी)’ वर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुनगंटीवार बोलत होते. जवळपास ४५० सीए सभासद या परिषदेत सहभागी झाले आहेत.
यावेळी ‘आयसीएआय’च्या जीएसटी अँड इनडायरेक्ट टॅक्स कमिटीचे व्हाईस चेअरमन सीए उमेश शर्मा, केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समिती सदस्य सीए ऋता चितळे, सीए यशवंत कासार, आयसीएआय पुणेचे चेअरमन सीए राजेश अग्रवाल, व्हाईस चेअरमन सीए अमृता कुलकर्णी, सचिव सीए अजिंक्य रणदिवे, सीए प्रणव आपटे, सीए मौशमी शहा, सीए सचिन मिणियार, सीए काशिनाथ पठारे आदी उपस्थित होते.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “कर व्यवस्थेत सुलभता, सहजता आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ‘एक देश एक कर’ अंतर्गत जुलै २०१७ पासून जीएसटी कायदा लागू करण्यात आला. या कायद्याच्या अंमलबजावणीत, तसेच त्यात सुसूत्रता आणण्यात सनदी लेखापालांनी सुरुवातीपासून महत्त्वाचे योगदान दिले. जीएसटी कौन्सिलच्या गेल्या ५० बैठकांतून अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. जीएसटीनंतर प्रत्येक राज्याचे उत्पन्न वाढले असून, वाढीचा दर १४ टक्क्यांवर गेला आहे. राज्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे.”
“करदाते, सनदी लेखापाल आणि सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नातून देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर आहे. ब्रिटनला आपण मागे टाकले असून, लवकरच तिसऱ्या क्रमांकांची अर्थव्यवस्था होण्याचे आपले स्वप्न पूर्ण होईल. देशासाठी योगदान देणारा आणि आर्थिक विकासात भर घालणारा सनदी लेखापाल भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले कौतुक केलेले आहे. तेव्हा आपण कर व्यवस्था अधिकाधिक सहज व सोपी करण्यात आणि कर संकलनात असेच योगदान देत राहावे,” असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले.
जीएसटी कायद्यातील नवे बदल’ याविषयी सीए उमेश शर्मा यांच्यासह इतर अनेक विषयांवर मार्गदर्शन सत्र झाले. सीए राजेश अग्रवाल यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सीए चंद्रशेखर चितळे यांनी वस्तू व सेवा करावरील परिषदेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. सीए मौशमी शहा यांनी सूत्रसंचालन केले. सीए यशवंत कासार यांनी आभार मानले.