तब्बल २१ हजार नागरिकांनी घेतला स्नेहभोजनाचा आस्वाद ; क्रान्तीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती कृती समितीतर्फे आयोजन
पुणे : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी महामिसळ आणि त्यापाठोपाठ लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती दिनी तब्बल २१ हजार नागरिकांना स्नेहभोजनाचा आस्वाद देत पुण्यामध्ये ‘एकता स्नेहभोजनाचा’ आगळावेगळा कार्यक्रम पार पडला. यानिमित्ताने एकतेचा संदेश देण्याकरिता वेगळ्या प्रकारे उपक्रम राबवित हजारो नागरिकांपर्यंत महापुरुषांच्या कार्याचे महत्व पोहोचविले जात आहे.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती कृती समितीतर्फे सारसबागेजवळील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ ‘एकता स्नेहभोजनाचे’ आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तब्बल २१ हजार नागरिकांनी पुलाव, बुंदी, कोशिंबीर असा स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. या उपक्रमाच्या आयोजनात प्रल्हाद गवळी, श्रीधर चव्हाण, सारंग सराफ, जयेश कसबे, सचिन विप्र, मंदार जोशी, गणेश पाटील, अमर आढागळे, बाळासाहेब ढमाले, विजय रजपूत, बाळासाहेब भामरे, महेंद्र मारणे यांनी सहभाग घेतला.
एकता स्नेहभोजनाकरिता १०० किलो दळलेले बेसन, २४ डबे तेल, ६०० किलो साखर, १२०० किलो तांदूळ यांसह ३ किलो खोबरे, ७५ किलो डबल बी, ७५ किलो शेंगदाणा कूट, ३ किलो जिरे, मोहरी, दीड किलो तमाल पत्र, १०० किलो फ्लॉवर, तोंडली, बटाटा, कांदा, २० किलो मिरची, १५ किलो आले लसूण, १५० किलो काकडी, १०० किलो दही, ६० किलो टोमॅटो असे मोठ्या स्वरूपात साहित्य वापरण्यात आले. विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांसह वैयक्तिक स्तरावर हे साहित्य गोळा करण्यात आले होते. यातून देखील एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार जयदेव गायकवाड, दीपक मानकर, संजय मोरे, वसंत मोरे, किशोर शिंदे, राजेंद्र वागस्कर, साईनाथ बाबर आदी मान्यवरांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीदिनी ‘एकता स्नेहभोजन’
Date:

