मुंबई-महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदेपदासाठी आमदार विजय वड्डेटीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने या बाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तर विधिमंडळाच्या नेतेपदी बाळासाहेब थोरात यांना कायम ठेवण्यात आले आहे. काँग्रेसकडे चार वर्षांनंतर हे पद आले आहे. त्यामुळे या पदावर कोणाची नियुक्ती होते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
राज्याच्या राजकारणात सुमारे चार वर्षांनंतर काँग्रेसकडे हे पद चालून आले आहे. काँग्रेसचे अनेक नेते हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. त्यामुळे या पदासाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे न जाणाऱ्या नेत्याच्या शोधात पक्षश्रेष्ठी होते. यात पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र, अखेर पक्षश्रेष्ठींनी विजय वड्डेटीवार यांच्या नावाची घोषणा केली असून त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
विधीमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच राहणार आहे. बाळासाहेब थोरात यांना हा निर्णय दिल्ली हायकंमाडने कळवला आहे. त्याचबरोबर आता महाराष्ट्राच्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदी विजय वड्डेटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर पक्षाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा दिल्ली व्याऱ्या झाल्या आहेत.
काँग्रेसमधील दुसऱ्या फळीतील नेत्याकडे ही जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता याआधी वर्तवण्यात आली होती. त्यानुसार सुनील केदार, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे यांच्या नावाची देखील चर्चा होती. मात्र, यात वड्डेटीवार यांच्या माध्यमातून जुन्या आणि नव्यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे.

