पुणे : विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये नोकरी करताना कोणती व कशी तयारी करावी, नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये कशी विकसित करावीत, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी, तसेच त्यांच्यातील रोजगार क्षमता वाढवण्यासाठी विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये ‘पाथेय-प्लेसमेंट सेल ओरिएंटेशन प्रोग्राम : चुजींग युअर करिअर’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.
समितीच्या डॉ. आपटे वसतिगृहात झालेल्या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अभय सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रसंगी समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, समितीचे कार्यकर्ते राजेंद्र ततार, रोटरी क्लबचे उज्वल केले, विनीत जोशी, देविदास वाबळे, मिलिंद जोशी, शेखर आघारकर आदी उपस्थित होते.
अभय सावंत म्हणाले, प्रत्येक मनुष्य हा वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या स्वतःला व स्वतःमधील क्षमतांना ओळखावे. नोकऱ्या मोठ्या प्रमाणात आहेत; पण कंपनी उत्तम मुलांच्या शोधात असते. कंपनीच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला स्वतःमध्ये बदल करावे लागतील. पदवी आपल्याला नोकरी देणार नाही; ते केवळ पाया भक्कम करण्याचे काम करते. इंग्रजी ही वैश्विक व औद्योगिक भाषा आहे. त्यामुळे ती अवगत करणे आणि स्वतःला सतत अपग्रेड (अद्ययावत) करत राहणे गरजेचे आहे. पाश्चिमात्य अर्थव्यवस्थे सोबत त्यांच्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यावर भर हवा.”
उज्वल केले सर यांनी ‘पाथेय’ या उपक्रमाची संकल्पना सांगितली. ‘पाथेय’ या शब्दाचा अर्थ ‘जो मार्गस्थ होतो’ असा असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रकांत कुलकर्णी यांनी विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन अंगारकी मांडे हिने केले. ओंकार शिंदे या विद्यार्थ्याने आभार मानले.

