पुणे-हातऊसणे घेतलेले पैसे परत न केल्यामुळे खासगी सावकाराने एका व्यक्तीच्या पत्नीवर त्याच्यापुढेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. हा सावकार एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावरही व्हायरल केला. या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.पुण्याच्या हडपसर भागात गत फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली. पण ती 34 वर्षीय पीडित विवाहितेच्या तक्रारीनंतर आज उजेडात आली. तिच्या फिर्यादीनुसार आरोपी इम्तियाज हसीन शेख (47) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीला आरोपीने उसने पैसे दिले होते. काही कारणामुळे पीडित दाम्पत्याला हे पैसे परत करता आले नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी व तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत हडपसर येथील म्हाडा कॉलनीत बोलावून घेतले. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या पतीला समोर बसवून त्याने चाकूचा धाक दाखवत पीडितेवर बलात्कार केला. यावेळी त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
आरोपीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर त्याने तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडे शरीर सूख देण्याची मागणी केली. पण महिलेने त्यास नकार दिल्यामुळे अखेर त्याने तो व्हिडिओ व्हायरल केला. यामुळे महिलेने थेट हडपसर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी इम्तियाज हसीन शेखच्या मुसक्या आवळल्या.

