पुणे :महापालिकेमधील कार्यालयात जाऊन उपायुक्त माधव जगताप यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना धमकाविणार्या माहिती अधिकार कार्यकर्त्यावर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दिनेश खराडे (वय ४५) असे या माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव आहे. हा प्रकार पुणे महापालिकेच्या (Pune PMC News) मुख्य इमारतीतील पहिल्या मजल्यावरील जगताप यांच्या कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी साडे पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश खराडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहिती अधिकार सेलचे काम करतात. माधव जगताप हे कार्यालयात काम करत असताना दिनेश खराडे हे मोहमदजी हुसेन लांडगे या दिव्यांग व्यक्तीला घेऊन आले. लांडगे यांच्या प्रश्नाबाबत दिनेश खराडे यांनी मी या व्यक्तीला घेऊन आलो आहे. तक्रार माझी आहे. असे म्हणून मी माहिती अधिकार कार्यकर्ता आहे. असे जोरात ओरडून मारण्यासाठी फिर्यादीच्या अंगावर धावून आला. फिर्यादी यांनी सुरक्षा रक्षकांना बोलावले असता फिर्यादी यांना बघून घेण्याची धमकी देऊन दरवाजात त्यांची वाट अडवली. मी जाणार नाही व तुम्हाला मी जाऊ देणार नाही, असे म्हणून शासकीय कामात अडथळा आणला, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक म्हस्के (PSI Mhaske) तपास करीत आहेत.

