यवतमाळ–
राज्यातील अनेक शहरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. विदर्भात पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. यवतमाळमध्ये पावसाचा जोर वाढल्याने आनंदनगर तांडा येथे 45 जण पुराच्या पाण्यात अडकले आहेत. तर, घराची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बचावकार्यासाठी राज्य शासनाने हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टरर्स मागवले. हवाईदलाच्या Mi-17 हेलिकॉप्टरने आता बचावकार्याला सुरूवात झाली आहे.संग्रामपूर तालुक्यात सुरू असलेल्या संततधार मुळे संग्रामपूर तालुक्यातील केदार नदीला पूर आला असून नदी दुथडी भरून वाहत आहे. या परिणामी बावनबीर, टूनकी गावांचा संपर्क तुटला असतानाच घरात पाणी घुसले आहे.जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासून हजेरी लावली आहे.
पैनगंगा नदीला पूर
मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पुर आला आहे. या पुराचा फटका अनेक गावांना बसला आहे. पुराने परिसरात वेढा घातल्याने अनेक जण पाण्यात अडकलेत. महागाव तालुक्यातील आनंद नगर येथील नागरिक पुराच्या पण्यात अडकले आहेत. त्यांचे बचावकार्य सुरू आहे.
परिसराला नदीचे स्वरुप
नदीचे पाणी आनंद नदरमध्ये शिरल्याने संपूर्ण परिसराला नदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. रस्त्यावर कंबरेच्यावर पाणी साचले आहे. आलेल्या पुरामुळे अनेकांची घरे वाहून गेली आहेत. बचाव पथक पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र पावसाचा जोर कायम असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या घटनेची नोंद घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले आहेत. आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून आता तासभरात भारतीय हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहोचतील आणि तेथून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगेच महागावसाठी रवाना होतील. सुमारे 231 मिमी पाऊस येथे झाला आहे. माझे सहकारी मदनभाऊ येरावार सुद्धा संपर्कात आहेत. परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.
महागाव तालुक्यातील हिवरा संगम गट ग्रामपंचायतमधील आनंद नगर येथे पाणी वाढत चालल्याने काही नागरिक बोटीवर बसलेत. या 45 जणांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आता पुराच्या पाण्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

