पुणे, दि. २१ : केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व विद्यालयामध्ये ७ वीपासून पुढील वर्गातील विद्यार्थ्यांसाठी युवा पर्यटन मंडळाची स्थापना करावयाची आहे. त्यासाठी प्रोत्साहन स्वरुपात ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य’ या तत्वावर अनुदान देण्यात येणार असून शाळा, महाविद्यालयांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन पुणे पर्यटन संचालनालयाने केले आहे.
युवा पर्यटन मंडळ स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन स्वरुप अनुदान म्हणून सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षांत शाळांमध्ये स्थापन केलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी १० हजार रुपये तर महाविद्यालयांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी २५ हजार रुपये असे अनुदान ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य’ या तत्त्वावर देण्यात येणार आहे.
देशातील, राज्यातील पर्यटन, समृद्ध वारसा व संस्कृती यांचे माहितीगार म्हणून जागतिक स्तरावर देशाची प्रसिद्धी करण्यासाठी व भारतीय पर्यटनाचे युवा राजदूत घडविण्यासाठी राज्यातील मान्यता प्राप्त शाळांमध्ये युवा पर्यटन मंडळाची स्थापना करावयाची आहे. यातून विद्यार्थी व तरुणांमध्ये संघभावना, व्यवस्थापन नेतृत्व आणि सेवा यासारखी महत्त्वाची कौशल्ये आत्मसात करण्याची वृत्ती तसेच शाश्वत व जबाबदार पर्यटनाची जाणीव जागृती निर्माण करण्यास सहाय्य होईल.
युवा पर्यटन मंडळाची स्थापना करण्याबाबत अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनालय पुणे विभागीय कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक- ०२०-२९९००२८९ व भ्रमणध्वनी क्रमांक ८०८००३५१३४ वर तसेच केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाचे संकेतस्थळ https://tourism.gov.in/whats-new/yuva-tourism-club या संकेतस्थळावरुन माहिती घेण्यात यावी, असे आवाहन पर्यटन संचालनालय पुणे विभागीय सहायक संचालक सुप्रिया करमरकर-दातार यांनी केले आहे.

