पुणे, दि. १९ : दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे व सांगली जिल्हा परिषद अधिनस्त कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह मिरज येथे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षणासाठी दिव्यांगानी अर्ज करण्याचे आवाहन, संस्थेच्या अधीक्षकांनी केले आहे.
शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, मिरज ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था असून या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाची शासन मान्यता आहे. या संस्थेत सुरू होणाऱ्या सर्टिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस. ऑफिस या संगणक कोर्ससाठी शैक्षणिक अर्हता इयत्ता ८ वी पास व मोटार अॅन्ड आर्मेचर वायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज या इलेक्ट्रीक कोर्ससाठी शैक्षणिक अर्हता ९ वी पास अशी आहे. उमेदवाराची वयोमर्यादा १६ ते ४० वर्ष इतकी असावी. प्रशिक्षण कालावधी १ वर्षाचा असून फक्त फक्त दिव्यांगांनाच या संस्थेत प्रवेश दिला जातो.
प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय केली जाणार आहे. प्रशिक्षणासाठी अद्यावत व परीपूर्ण अशी संगणक कार्यशाळा असून भरपूर प्रात्यक्षिके व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहेत. अनुभवी व तज्ज्ञ निदेशक यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी बीज भांडवल योजना राबविली जाणार आहे.
प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन छायाचित्रासह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरुन द्यावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ज्ञ समिती द्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, एसएससी गुणपत्रक, प्रमाणपत्र, अपंगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला यांच्या छायांकित प्रती जोडाव्यात.
प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधीक्षक शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज, जि. सांगली-४१६४१० या पत्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत मिळतील. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२३३-२२२२९०८ व भ्रमणध्वनी क्रमांक ९९२२५७७५६१, ९५९५६६७९३६ वर संपर्क साधावा.
प्रवेशासाठी माफक जागा असल्याने ग्रामीण व शहरी भागातील गरजू दिव्यांगानी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
0000

