मुंबई- किरीट सोमैय्या तथाकथित व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आज शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी पटलावर पेन ड्राईव ठेवत जोरदार टीकेचे अस्त्र सोडले तर अनिल परब यांनी हि ED, सीबीआय च्या धमक्या देऊन काय काय धंदे कोणी केले याची चौकशी करा अशी मागणी केली .
भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओंमध्ये दिसणारी व्यक्ती अश्लील कृत्य करताना दिसत आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने हा व्हिडीओ प्रसारीत केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभागृहातही उमटले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबतचा एक पेनड्राईव्ह विधानपरिषद उपसभापतींकडे जमा केला. यावेळी दानवेंनी किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले.
अंबादास दानवे विधानपरिषदेत म्हणाले, “आपलं राज्य फुले, शाहू, आंबेडकर, जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि आहिल्याबाई होळकर यांचं आहे. असं असताना सत्ताधारी पक्षातील काही मंडळी या सगळ्या विचाराला छेद देत असल्याची स्थिती आहे. मी कोणत्या राजकीय पक्षाचं नाव घेत नाही. परंतु काही लोक आहेत, जे ईडी, सीबीआय आणि आयटी विभागाची भीती दाखवतात. या माध्यमातून काही लोकांना ब्लॅकमेलिंग करणं आणि खंडणी गोळा करण्याचं काम केलं जातंय. याबाबतच्या काही बाबी समोर आल्या आहेत.”
संबंधित व्यक्ती त्यांच्या पक्षातल्या महिला-भगिनींना पद, जबाबदारी, मंडळं, महामंडळं देतो. माझा ईडी, सीबीआय आणि आयटी अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. अशी भीती दाखवून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करतात. जे राजकीय पक्ष नैतिकतेचे धडे देतात, त्याच पक्षाचा एक मोठा पदाधिकारी असलेल्या व्यक्तीने जे काही केलं आहेत, ते अतिशय धक्कादायक आहे. अनेक महिलांना राज्यसभा, विधानपरिषद आणि महामंडळात नियुक्त्या देतो, असं सांगून ब्लॅकमेलिंग केलं जात आहे,” असा आरोप अंबादास दानवेंनी केला.
“या प्रकरणात गुन्हा करणारी व्यक्ती कोण आहे, कोणत्या पक्षात आहे, हा विषय महत्त्वाचा नाही. ही प्रवृत्ती महत्त्वाची आहे. म्हणून माझ्याकडे काही व्हिडीओज आले आहेत. काही माता-भगिनींनी अतिशय हिंमत करून हे व्हिडीओ माझ्यापर्यंत पोहोचवले आहेत. त्या भगिनींना मी सलाम करेन. कारण हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला केंद्राची सुरक्षितता आहे. या सुरक्षितेचा वापर महिलांकडून खंडणी करण्यासाठी केला जातोय की काय? अशी स्थिती आहे,” असंही दानवेंनी नमूद केलं.