महावितरणची पुणे परिमंडलामध्ये वेगवान कामगिरी
पुणे, दि. १३ जुलै २०२३: नवीन वीजजोडण्या देण्यास महावितरणने मोठा वेग दिला असून गेल्या दीड वर्षांमध्ये पुणे परिमंडलात सर्व वर्गवारीच्या तब्बल २ लाख ५६ हजार ९५६ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यात घरगुती ग्राहकांना दिलेल्या सर्वाधिक २ लाख १५ हजार १७६ नवीन वीजजोडण्यांचा समावेश आहे. मागील आर्थिक वर्षांत १ लाख ९५ हजार ९८६ तर विशेष म्हणजे गेल्या एप्रिल ते जूनपर्यंतच्या केवळ तीन महिन्यांत ६० हजार ९७० नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ग्राहकसेवा गतीमान करण्यासोबतच नवीन वीजजोडण्यांना वेग देण्याची सूचना केली आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी नवीन वीजजोडण्यांचे अर्जांबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच पुरेशा प्रमाणात नवीन वीजमीटर देखील उपलब्ध करून दिले आहेत. नवीन वीजजोडण्या व वीजमीटरच्या उपलब्धतेबाबत संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांच्याकडून सातत्याने आढावा घेण्यात येत आहे.
पुणे परिमंडल अंतर्गत देखील नवीन वीजजोडण्या व आवश्यकतेनुसार वीजमीटरचा पुरवठा व्हावा यासाठी दर आठवड्यामध्ये दोनदा मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याकडून विभागनिहाय आढावा घेण्यात येत आहे. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया अधिक गतीमान झाली आहे. त्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्याची गतीमानता आणखी वाढली असून गेल्या पंधरवड्यात तब्बल १४ हजार ८६६ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये घरगुती-१२ हजार ५९६, वाणिज्यिक- १६३६, औद्योगिक- २३७, कृषी-२५५ व इतर १४२ वीजजोडण्यांचा समावेश आहे.
पुणे परिमंडलामध्ये दरवर्षी दीड ते पावणेदोन लाख नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. मात्र सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांत १ लाख ९५ हजार ९८६ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. यामध्ये घरगुती- १ लाख ६३ हजार १६६, वाणिज्यिक- २१ हजार ९८८, औद्योगिक- ३७४५, कृषी- ३८६७ व इतर ३२२० वीजजोडण्यांचा समावेश आहे. त्यानंतर गेल्या एप्रिलपासून नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया आणखी वेगवान करण्यात आली आहे. जूनपर्यंतच्या तीन महिन्यात तब्बल ६० हजार ९७० नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. यात घरगुती- ५२ हजार १०, वाणिज्यिक- ६८७३, औद्योगिक- ८८०, कृषी- ५६२ व इतर अशा ५४५ वीजजोडण्यांचा समावेश आहे.
पुणे परिमंडलामध्ये मुबलक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. यासह नवीन वीजजोडणी संदर्भात काही तक्रार असल्यास ग्राहकांनी संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी थेट संपर्क साधावा. वीजग्राहकांना बाजारातून मीटर खरेदी करण्याची आवश्यकता नाही असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
| पुणे परिमंडलाची कामगिरी: दीड वर्षांमध्ये २,५६,९५६ नवीन वीजजोडण्या | |||
| वर्गवारी | पुणे शहर | पिंपरी चिंचवड शहर | आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुके |
| घरगुती | ८८,२६१ | ६००४६ | ६६८६९ |
| वाणिज्यिक | १२,५७१ | ८२०३ | ८१८७ |
| औद्योगिक | ११२८ | १५७६ | १९२१ |
| कृषी व इतर | १३०५ | १४५५ | ५४३४ |
| एकूण | १०३२६५ | ७१२८० | ८२४११ |
नवीन वीजजोडण्यांच्या प्रक्रियेला विशेष वेग देण्यात आला आहे. त्यासाठी परिमंडल अंतर्गत सर्व विभागांमधील नवीन वीजजोडणी तसेच वीजमीटरच्या उपलब्धतेबाबत दर सोमवारी व गुरुवारी विभागनिहाय आढावा घेण्यात येत आहे.
श्री. राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल

