अजित पवार अर्थ, महसूल, जलसंपदासाठी आग्रही
मुंबई-गत काही दिवसांत सातत्याने बैठका होऊनही खातेवाटपाचा तिढा सुटला नाही. त्यामुळे आता हा वाद दिल्लीत भाजपश्रेष्ठींच्या दरबारात सुटण्याची शक्यता आहे. त्यासाठी अजित पवार बुधवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीला जाणार आहेत. ते तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून या मुद्यावर तोडगा काढतील, असा अंदाज आहे.
शिंदे – फडणवीस – पवार सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार आणखी लांबण्याची शक्यता आहे. हा विस्तार बुधवारी सायंकाळी होण्याची शक्यता होती. पण अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट काही महत्त्वाच्या खात्यांसाठी अडून बसला आहे. त्यामुळे शिंदे – फडणीसांची मोठी गोची झाली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार बुधवारी सायंकाळी तातडीने दिल्लीला रवाना झाले. शिंदे व फडणवीसही लवकरच दिल्ली गाठणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम मंत्रिमंडळ विस्तार करा आणि नंतर योग्यवेळी खातेवाटप करु, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खातेवाटपाची चर्चा सुरु झाली होती. त्यानुसार मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांत मॅरेथॉन बैठका झाल्या. पण खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही.
अजित पवार यांचा गट महसूल, अर्थ व जलसंपदा या 3 खात्यांसाठी अडून बसला आहे. महसूल खाते सध्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे आहे. तर अर्थ व जलसंपदा ही दोन्ही खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. शिंदे गटाच्या आमदारांचा अजित पवारांना अर्थखाते देण्यास ठाम विरोध आहे. या आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बंड करताना तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांवर निधीवाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप केला होता. आता पुन्हा हे खाते अजित पवारांकडे गेल्यास ते पूर्वीसारखाच व्यवहार करू शकतात, असा शिंदे गटाचा युक्तिवाद आहे.

