म. फुले ,सावित्रीमाई यांचा अवमान करणार्यांना साथ..
बहुजनांच्या फोडाफोडीचे एजंट फडणवीस
माजी आमदार लक्ष्मण माने यांचा आरोप
सातारा: देशातील बहुजन समाजाला सर्वाधिक धोका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आहे. याच संघाच्या लोकांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला असतानाही अजित पवार, छगन भुजबळांसह इतर काहीजण आता मांडीला-मांडी लावून सत्तेत सहभागी झाले आहेत.ही भूमिका आमच्या विचारधारेच्या विरोधी असल्याचे मत माजी आमदार लक्ष्मण माने यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले.शरद पवार यांच्यासारख्या सर्वोच्च नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसून हे नऊ जण त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत असल्याची टीका माने यांनी केली. अजित पवार यांनी शरद पवारांना निवृत्तीचा सल्ला देऊन अडगळीत टाकण्याचा मानस असल्याचे दिसून येत आहे. शरद पवार हे लढवय्ये असून, त्यांना शेवटपर्यंत साथ देणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
दरम्यान, या फोडाफोडीच्या राजकारणाचे एजंट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोपही त्यांनी केला. या वेळी प्रा. अशोक जाधव उपस्थित होते. श्री. माने म्हणाले, ”पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाला पाहिजेत तोपर्यंत सत्तेत राहणार आहेत. लोकशाही, धर्मनिरपेक्षता पायदळी तुडविण्याचे काम संघाने केले असून, प्रादेशिक पक्षात फूट पाडून लोकशाही धोक्यात आणली जात आहे.देशातील ब्राह्मण समाज असुरक्षित असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. भाजप हा पक्ष लोकशाहीवादी पक्ष नसून देशात हुकूमशाही आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. भाजपच्या मागे बुरखाधारी असलेली आरएसएसची छुपी कार्यपद्धती असल्याचे दिसून येत आहेसंघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठबळ असून, त्यांच्यासह अमित शहा, अदानी व अंबानी या चार जणांनी देश विकला आहे.” नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर लगेच अजित पवारांसह इतर काही जण भाजपसोबत सत्तेत सहभागी होत आहेत. त्यामुळे मोदींनी राष्ट्रवादीवर आरोप केले त्याचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

