पुणे : सहकार नगरमधील तळजाई परिसरात कोयता गँगकडून पुन्हा ‘भाईगिरी’ करत दहशत माजविण्याची घटना घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच तळजाई वसाहतीत टोळक्याने २६ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती.
या प्रकरणी माऊली शिंदे (वय १९, रा. तळजाई वसाहत) याने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर रंगनाथ आरडे (वय २२), रोहन ऊर्फ गायसोन्या राजू आरडे (वय २१), ऋषिकेश ऊर्फ बारक्या संजय लोंढे (वय २३), जयेश ऊर्फ जयड्या दत्ता ढावरे (वय १८), वृषभ शंकर कांबळे (वय २३), अनिकेत ऊर्फ गुड्डू रवींद्र शिंदे (वय २४), आकाश मनोज डाकले (वय २३), आदित्य ऊर्फ सँडी पद्माकर डाकले (वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माऊली शिंदे आणि त्याचा मित्र पाच जुलै रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास तळजाई वसाहत परिसरात उभे होते. त्या वेळी दहा ते बारा जणांच्या टोळक्याने कोयते हवेत फिरवत ”तुम्ही या भागातील भाई झाले का”, असे म्हणत एका टपरीची तोडफोड केली. तसेच, नागरिकांना शिवीगाळ करून दहशत माजवली. ”आम्ही या भागातील भाई आहोत. आमच्या नादाला लागला, तर जीवे ठार मारू”, अशी धमकी दिली.
तळजाई परिसरात कोयता गँगकडून पुन्हा ‘भाईगिरी’ करत दहशत माजविण्याची घटना :टोळक्याला अटक
Date:

